अखेर कांदा निर्यातबंदी उठली; निर्यात लवकरच सुरू होणार!

Onion-Maharashtra
Onion-Maharashtra

नाशिक : केंद्रीय ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी ट्‌विटद्वारे कांदा निर्यातबंदी उठवल्याची खूषखबर शेतकऱ्यांना दिली. पण प्रत्यक्षात याची अधिसूचना पाच दिवसांनंतर जारी केली आहे. कांद्याची निर्यात १५ मार्चपासून खुली होणार आहे. वाणिज्य मंत्रालयाने निर्यातीसाठी कुठल्याही अटी-शर्ती लागू केलेल्या नाहीत. 

कांदा निर्यातबंदी उठवल्याचे ट्विट पासवान यांनी २६ फेब्रुवारीला केले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी कांद्याच्या भावात क्विंटलमागे लासलगावमध्ये चारशे, तर पिंपळगावमध्ये तीनशे रुपयांनी वाढ झाली. मात्र ४८ तास झाले, तरीही अधिसूचना जारी होत नाही म्हटल्यावर भाव शंभर ते साडेतीनशे रुपयांनी गडगडल्याने शेतकऱ्यांमधील संताप वाढीस लागला. अधिसूचनेअभावी क्विंटलला ६०० ते ७०० रुपयांनी सोमवारपर्यंत (ता. २) भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचा पारा चढला होता.

त्याचबरोबर लासलगावमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी दोन दिवसांत कांदा निर्यातबंदी उठवल्याची अधिसूचना जारी न झाल्यास रेल्वे आणि रास्ता-रोको आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनापर्यंत पोचल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कांदा निर्यातबंदी उठेपर्यंत संयम बाळगावा, असे शेतकऱ्यांना आवाहन केले होते. 

भारतीय कांद्याला मिळेल पसंती 

पाकिस्तानने ३० मेपर्यंत कांदा निर्यातबंदी जाहीर केली आहे. चीन कोरोनाग्रस्त असल्याने कांद्याच्या ‘शिपमेंट’ला म्हणावा तसा वेग नाही. तुर्कस्थान आणि इजिप्तचा कांदा बाजारात मेमध्ये येईल. अशा साऱ्या जागतिक परिस्थितीत सध्या हॉलंड, सुदान, ऑस्ट्रेलियाचा कांदा विकला जात आहे. आता भारतीय कांदा जगाच्या बाजारपेठेत पोचणार असल्याने तुटलेले ग्राहक मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, सप्टेंबर २०१९ मध्ये केंद्राने कांदा निर्यातबंदी केली होती. देशात जानेवारी अखेरपर्यंतच्या लागवडीनुसार ३४ टक्‍क्‍यांनी अधिक उत्पादन अपेक्षित आहे. उन्हाळ कांद्याची लागवड सुरू असल्याने अतिरिक्त कांद्याचे प्रमाण वाढणार आहे. हीच बाब रामविलास पासवान यांनी ट्‌विटमध्ये मान्य केली होती. त्यांच्या मंत्रालयाने कांदा निर्यातबंदी उठवण्यास ‘हिरवा कंदील’ दाखवला होता. मात्र, वाणिज्य मंत्रालयात फाइल अडकली होती. 

‘सकाळ’च्या वृत्ताला सकारात्मक प्रतिसाद 

पासवान यांनी कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय झाल्याचे जाहीर करूनही त्यासंबंधीची अधिसूचना जारी होत नसल्याने पतपत्र, किमान निर्यातमूल्य दर, कोटा पद्धतीचा अवलंब केंद्राकडून केला जाण्याची शंका उपस्थित केली होती. त्यासंबंधीचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यास वाणिज्य मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून पतपत्र, किमान निर्यातमूल्य अशा अटीविना निर्यात खुली होणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. 

‘‘केंद्राने निर्यात खुली होण्याचा दिवस निश्‍चित केला आहे, त्यामुळे तोपर्यंत शेतकरी कांदा बाजारात आणण्याची घाई करणार नाहीत. तसेच, आणखी बाजारभाव कोसळण्याची आता शक्‍यता नाही. याशिवाय मार्च एण्डसाठी सात ते दहा दिवस बाजारपेठा बंद राहणार आहेत. या साऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्राने १५ मार्चऐवजी १० मार्चला निर्यात खुली करण्याचा पुनर्विचार करायला हवा.’’ 
- विकास सिंह (कांदा निर्यातदार) 

असे झाले आंदोलन 

- शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले 
- सटाण्यामध्ये शेतकऱ्यांची केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी 
- येवल्यात बाजार समितीसमोर रास्ता-रोको 
- महामार्गांवर कांदे ओतत रास्ता-रोको आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com