परतीचा तडाखा; विदर्भ, मराठवाड्याला झोडपले; पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

कोरोनामुळे शिवाराचा आर्थिक गाडा गाळामध्ये रुतला असताना आता परतीच्या पावसाने बळिराजाच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. पुणे, सांगली आणि कोल्हापूरलाही या पावसाने चांगलेच झोडपले. आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

पुणे - कोरोनामुळे शिवाराचा आर्थिक गाडा गाळामध्ये रुतला असताना आता परतीच्या पावसाने बळिराजाच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. पुणे, सांगली आणि कोल्हापूरलाही या पावसाने चांगलेच झोडपले. आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडत आहे. विदर्भातील जोरदार पाऊस होत आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे सर्वाधिक ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी (ता. १०) राज्यात बहुतेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली.  पावसामुळे कापूस, सोयाबीन, भात, ऊस पिकांचे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या तीन ते चार दिवसांपासून विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. त्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणातही तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. कोकणात पडत असलेल्या पावसामुळे भात काढणी खोळंबण्याची शक्यता आहे. कुलाबा, राजापूर, दोडामार्ग, सावंतवाडी, वैभववाडी परिसरात पावसाच्या चांगल्याच सरी पडल्याने भाताचे नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे.

सध्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून ढगाळ हवामानासह ऊन पडत आहे. मात्र, शनिवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामानासह मेघगर्जनेसह तुरळक सरी पडल्या. या पावसामुळे भात पट्यातील पिकांना दिलासा मिळत असला तरी खरिपातील पिकांसाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. नगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. तर अकोले येथे ४२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत वादळी पाऊस झाला. पाटोदा, कन्नड, जालना, लोहापूर, सेलू, परांडा येथे पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे सोयाबीन पिकांची काढणी खोळंबल्या असून शेतीकामांची गती मंदावली आहे. विदर्भातही सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांतील अनेक भागात पावसाच्या चांगल्याच सरी पडल्या. तर बटकुली, चांदूरबाजार, मूल, कोर्ची, गोंदिया, शेगाव, तिवसा, वरूड, पवनी या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या असून तूर, कापूस पिकांना काहीसा दिलासा मिळाला.

आठवडाभर पाऊस
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम वातावरणावर झाला आहे, त्यामुळेच पाऊस पडत आहे. पुढील आठवडाभर राज्यात पाऊस राहणार असून मेघगर्नजेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. गुजरात व मध्य प्रदेशातून माघार घेतलेल्या परतीच्या पावसासाठी राज्यातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in maharashtra