चिंताजनक! राज्यातील पोलिसांभोवती कोरोनाचा संकट वाढतेय; 24 तासांत उच्चांकी नोंद

अनिश पाटील
Tuesday, 25 August 2020

सध्या राज्य पोलिस दलात दोन हजार 569 कोरोनाबाधीत सक्रीय रुग्ण आहेत. राज्य पोलिस दलातील 11 हजार 356 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून त्यातील बहुसंख्य पोलिस पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत

मुंबई : मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असला तरी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, राज्यातील नागरिकांची कोरोनापासून बचाव करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांभोवती कोरोनाचे संकट वाढतच चालला आहे. आज तर कोरोना बाधित पोलिसांची विक्रमी नोंद झाली आहे. गत 24 तासांत राज्यातील तब्बल 351 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून एकाच दिवसात कोरोनाग्रस्त झालेल्या पोलिसांचा हा उच्चांक आहे. याशिवाय राज्यातील तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलातील मृतांचा आकडा 142 वर पोहोचला आहे. 

कोरोनामुळे यंदा मुंबईत गणेश भक्तीलाही ओहटी; गणेशमुर्ती विसर्जनाचे प्रमाण झाले कमी

गेल्या 24 तासांत राज्यात 351 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलातील आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या पोलिसांचा आकडा 14 हजार 067 वर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यातील 142 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात 15 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्य पोलिस दलात दोन हजार 569 कोरोनाबाधीत सक्रीय रुग्ण आहेत. राज्य पोलिस दलातील 11 हजार 356 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून त्यातील बहुसंख्य पोलिस पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत चार हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे 

Raigad Building Collapse: 10 वर्षे जुनी इमारत पत्त्यासारखी कशी कोसळली?, पाच जणांवर गुन्हा दाखल

याशिवाय गेल्या 24 तासांत तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यातील 55 वर्षीय सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय अहमदनगर पोलिस दलातील एका हवालदाराचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: highest no of police persons get corona affected within 24 hrs in maharashrta