
अपघात की घातपात? आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला? एकनाथ शिंदेंचा खुलासा
शिवसैनिक आनंद दिघे यांची लोकप्रियता त्यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी आजही कायम आहे. धर्मवीर या त्यांच्या आय़ुष्यावरच्या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद दिघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या मृत्यूविषयी अनेक चर्चा सुरू आहेत. आजही त्यावर पूर्णविराम लागलेला नाही. काही जणांच्या म्हणण्यानुसार हा अपघात होता, तर काही जणांनी घातपात असल्याचा दावा केला. पण याचं खरं कारण काय?
आनंद दिघे यांचे शिष्य आणि राज्याचे नागरी विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मृत्यूमागचं कारण सांगितलं आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणतात, "त्यांच्या मृत्यूबद्दल विविध चर्चा लोक करतच असतात. पण दिघेसाहेब गेल्यामुळे आमचं खूप नुकसान झालं, पक्षाचं नुकसान झालं, संघटनेचं नुकसान झालं. दिघेसाहेब एका दिवसात दोन दिवसांचं काम करायचे. बाळासाहेबही त्यांना सांगायचे की आनंद तू प्रकृतीची काळजी घे. हार्टअटॅक आला, आजारी होते, तेव्हा ते देवीच्या मिरवणुकीत गेले. बाळासाहेबांनी थांब म्हणून सांगितलं होतं. पण काय त्यांची दैवी शक्ती होती."
लोकांच्या मनात दिघेंच्या मृत्यूबद्दल संभ्रम आहे. त्याबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, "त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पायाला अपघात झाला होता. पण निदान झालं की हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला".
शिवसैनिक आनंद दिघे यांच्या आयुष्यावर 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. कालच या चित्रपटाच्या ट्रेलरचं लाँच झालं. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते, मंत्री तसंच अभिनेता सलमान खान उपस्थित होते.