
आनंद दिघे होते म्हणून आज एकनाथ शिंदे आहेत.. ही घटना माहितीये का?
DHARMVEER : गेल्या काही दिवसात चर्चत असलेल्या धर्मवीर या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. धर्मवीर आनंद दिघे (anand dighe) यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसादचा हा लुक रिव्हिल झाला असून प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले आहेत. पाठोपाठ या चित्रपटाची गाणीही रिलीज झाली असून या लाखो चाहते त्या गाण्यांमध्ये हरवून गेले आहेत. १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी आतापासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत आहेत. पण या सगळ्यात एक अत्यंत भावनिक घटना समोर आली आहे.
एका वृत्त वाहिनीने 'धर्मवीर' चित्रपटाच्या निमित्ताने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता प्रसाद ओक यांची मुलाखत घेतली होती. यावेळी आनंद शिंदे यांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भावुक झाले. यावेळी शिंदे म्हणाले, 'प्रसाद ओक यांना दिघे साहेबांच्या वेशभूषेत पाहून मला पुन्हा दिघे साहेबच माझ्या जवळ असल्याचा अनुभव येत आहे. आनंद दिघे यांनी फक्त ठाण्यासाठीच नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी काम केलं आहे. जिथे कुठे कधी संकटं यायची दिघे साहेब आणि त्यांची टीम, आम्ही तिथे पोहोचायचो. त्यामुळे त्यांचं काम इतकं प्रचंड होत की, लोक त्यांना देव मनात होते. ते एक समांतर सरकार चालवत होते. म्हणजेच जिथे कोणाला न्याय मिळत नव्हता. अशांना दिघे साहेबांनी न्याय मिळून दिला,'अशा शब्दात त्यांनी आनंद दिघेंचे कौतुक केले.
यावेळी चित्रपटात तुला भावलेला प्रसंग कोणता असा प्रश्न प्रसादला विचारला जातो. त्यावर प्रसाद म्हणतो, 'आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा नरिमन पॉईंटला शूट झालेला एक सीन आहे. शिंदे साहेब एका प्रसंगामुळे प्रचंड दुःखात असतात. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी दिघे साहेब त्यांना नरिमन पॉईंटला घेऊन जातात. ज्यामध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संवाद हा कृष्ण- अर्जुना प्रमाणे आहे.'
तर या प्रसंगी नेमकं काय झालं होतं असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारला जातो. त्यावेळी त्यांचे डोळे भरून येतात आणि ते म्हणतात, ' ती आठवण काढतानाही मला अवघड होतंय. ही घटना २००० सालची आहे. यावेळी माझ्या दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाला. त्यावेळी हा आघात इतका मोठा होता की माझं आयुष्यच बदलून गेलं. त्यावेळी दिघे साहेब हे एक दिवसाआड माझ्याकडे यायचे. एकदा ते मला म्हणाले, काय करतोयस?.. तेव्हा मी म्हणालो. 'काही नाही साहेब आता सर्वच संपलं...'
'त्यावेळी साहेब म्हणाले, असं करू नको. त्यांनी मला सावरलं. मी कामात व्यस्त राहावं म्हणून त्यांनी माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या. मला ठाणे सभागृहाचे नेतेपद दिले. ते मला मुद्दाम अवघड काम सोपवायचे आणि मी ते पूर्ण करायचो. ते म्हणाले.. तुझे कुटूंब लहान नाही तर मोठं आहे. लोकांसाठी काम कर,' अशी आठवण सांगत शिंदे म्हणाले, त्यांच्या या दूरदृष्टी मुळेच मी आज तुमच्यासमोर आहे. हा प्रसंग चित्रपटातही आला असून या प्रसंगातील एक संवाद प्रसादने यावेळी म्हणून दाखवला. तो असा की, ''एकनाथ ही वेळ महत्वाची आहे. तुझे डोळे कोरडे ठेवून लोकांचे ओले डोळे पूस, लोकांचा लोकनाथ हो.. अनाथांचा एकनाथ हो..''