नवीन शैक्षणिक धोरणात ‘पंढरीच्या वारीचे व्यवस्थापन’! विद्यापीठ उभारणार वारकरी संप्रदाय अभ्यास केंद्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय ज्ञान, परंपरा, संस्कृती जोपासणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या वारीची किर्ती जगभरात आहे. त्यावर अधिक अभ्यास व संशोधन होणार आहे.
Pandharpur Wari
Pandharpur Warisakal

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय सोमवारी (ता. २६) घेण्यात आला आहे. भारतीय ज्ञान, परंपरा, संस्कृती जोपासणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या वारीची किर्ती जगभरात आहे. त्यावर अधिक अभ्यास व संशोधन करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याचबरोबर जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अरूण राठोड या खेळाडूच्या संपूर्ण खर्चासाठी अंदाजे दोन लाख रुपये देण्याच्या विषयास देखील मान्यता देण्यात आली. टीचिंग-लर्निंग सेंटर विद्यापीठात सुरू व्हावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव देण्याच्या विषयास यावेळी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. हे प्रस्ताव सिनेटकडून शिफारस होऊन आले होते.

विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत आराखड्यास व्यवस्थापन परिषदेने दुरुस्तीसह मान्यता दिली. आता विद्यापरिषद व त्यानंतर अधिसभेच्या बैठकीत हे विषय मांडण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाद्वारे रोजगार देण्यासाठी ‘टीम- लीज’ या कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यास देखील आज मान्यता मिळाली. तसेच ‘प्रो रेटा’ (विद्याशाखेच्या कार्यक्रमांसाठी आकारली जाणारी रक्कम) शुल्क वाढविण्याचा विषय व्यवस्थापन परिषदेत होता. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून विद्यार्थीहित केंद्रस्थानी ठेवून, विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे वाढीव शुल्क न घेण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. कामत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. बैठकीचे सदस्य सचिव म्हणून कुलसचिव योगिनी घारे यांनी काम पाहिले.

‘व्यवस्थापन’च्या सभागृहास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहास राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. त्याला सर्वांनीच मान्यता दिली.

नवीन शैक्षणिक धोरणात ‘वारी व्यवस्थापन’

वर्षानुवर्षांची परंपरा या पंढरीच्या वारीला आहे. वेगवेगळ्या प्रांतातील लोक असूनही वारी व्यवस्थापन अचूक व नेमके असते. कोठेही गडबड होत नाही. दुसरीकडे आपण व्यवस्थापनावर कोट्यवधींचा खर्च करतो. तसेच वारी व संत साहित्यातून कर्मसिद्धांत देखील सांगितला आहे. त्यावर या अभ्यास केंद्रातून संशोधन होणार आहे. त्यासाठी शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत इंडियन नॉलेज सिस्टिममध्ये हा वारी व्यवस्थापन व महत्त्व हा विषय घेतला जाणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ. रजनीश कामत यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com