सोलापुरातून वाढले स्थलांतर! २.५६ लाख तरूण-तरूणींनी मागितला रोजगार

सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील अडीच लाखांवर तरुण-तरुणींनी रोजगार मिळावा म्हणून जिल्ह्याच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाकडे नोंदणी केली आहे. जिल्ह्यात अपेक्षित रोजगार मिळत नसल्याने पुणेरी सोलापूरकर वाढल्याचीही वस्तुस्थिती आहे.
solapur
solapursakal

सोलापूर : सात वर्षांत एकही मोठी शासकीय नोकरभरती झाली नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील अडीच लाखांवर तरुण-तरुणींनी रोजगार मिळावा म्हणून जिल्ह्याच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाकडे नोंदणी केली आहे. जिल्ह्यात अपेक्षित रोजगार मिळत नसल्याने पुणेरी सोलापूरकर वाढल्याची ही वस्तुस्थिती आहे.

जिल्ह्यातील एक हजार ६३ शाळा-महाविद्यालयांमध्ये दरवर्षी सव्वालाख विद्यार्थी दहावी-बारावीचे शिक्षण पूर्ण करतात. काहीजण डिप्लोमा करतात तर काहीजण पदवीसाठी (पारंपारिक व व्यावसायिक शिक्षण) प्रवेश घेतात.

सोलापूर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व ‘बाटू’शी संलग्नित १४ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. दुसरीकडे पाच फार्मसी महाविद्यालये आहेत. जिल्ह्यातील पाच ते साडेपाच हजार विद्यार्थी दरवर्षी इंजिनिअर होतात. तर पारंपारिक व इतर व्यावसायिक शिक्षणाची पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील ३५ हजारांपेक्षा जास्त आहे. शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या सर्वांनाच नोकरी तथा जॉब मिळतोच, असे नाही.

काही तरुण-तरुणीच्या अपेक्षा जास्त असतात आणि त्यांना सोलापूर जिल्ह्यात तसा जॉब मिळत नाही. त्यामुळे पुणेरी सोलापूरकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हातावरील पोट असलेल्या कुटुंबातील तरुण उच्चशिक्षित असूनही आपल्याच जिल्ह्यात नोकरी मिळत नसल्याने तो कुटुंबासह दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करीत आहे.

नोकरीसाठी नोंदणी केलेले...

  • तरुण

  • १,८०,९१२

  • तरुणी

  • ७६,३८४

  • एकूण

  • २,५७,२९६

  • मागील वर्षी नोकरी मिळालेले

  • १,८३१

दरमहा असावेत रोजगार मेळावे

सुशिक्षित बेरोजगारांना आपल्याच शहर-जिल्ह्यात नोकरी मिळावी, यासाठी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाने दरमहा तालुकानिहाय किंवा शहराच्या ठिकाणी रोजगार मेळावे घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आता शिक्षण पूर्ण करून हातात पदवी आली, पण अपेक्षित नोकरी मिळाली नाही, अशी समस्या हजारो तरुण-तरुणींची आहे. नोकरीच्या शोधात अनेकांचे वय वाढत असून काही तरुण-तरुणी नैराश्याचे शिकार होत आहेत. मागील वर्षी जिल्ह्यातील पंढरपूर, सोलापूर, मंगळवेढा, बार्शी, अकलूज येथे रोजगार मेळावे पार पडले. त्यातून जवळपास दोन हजारांपर्यंत तरुण-तरुणींना नोकरी मिळाली आहे.

जिल्ह्यातील साडेचार लाखजण स्थलांतरित

मुलगा किंवा मुलगी शिकून मोठा झाला की त्याला नोकरी लागेल, मग आपली आर्थिक स्थिती सुधारेल, असे प्रत्येक पालकाचे विशेषतः: हातावरील पोट असलेल्या कुटुंबाचे स्वप्न असते. परंतु, उच्चशिक्षित असूनही आपल्या जिल्ह्यात अपेक्षित नोकरी मिळत नसल्याने अनेकांनी पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये स्थलांतर केल्याची देखील वस्तुस्थिती आहे. कोरोना लसीकरणावेळी जिल्हा प्रशासनाला तब्बल पावणेपाच लोक विशेषतः: तरुणांचा शोधच लागला नाही. तेवढ्या लोकांनी सोलापूर जिल्ह्यातून स्थलांतर केले असून त्यातील काहीजण कायमचे तर काही तात्पुरत्या स्वरूपातील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com