फॅसिलिटी असूनही रिसर्चमध्ये भारत मागेच; जागतिक कीर्तीच्या वैज्ञानिकाची खंत!

Dr.Arnab-Roy-Chowdhury
Dr.Arnab-Roy-Chowdhury

पुणे : विसाव्या शतकाच्या सुरवातीला संशोधनासाठी देशामध्ये संसाधनांचा अभाव आणि प्रतिकूल परिस्थिती होती, असे असतानाही मेघनाथ सहा, बोस, सी.व्ही रामन आदी शास्त्रज्ञांनी महान शोध लावले.

आज आपल्याकडे आधुनिक संसाधने असतानाही आपण संशोधनात त्या दर्जाचे काम करू शकलो नाही, अशी खंत भारतीय विज्ञान संस्थेचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अर्नब रॉय चौधरी यांनी व्यक्त केली. 

आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रात (आयुका) पाचव्या आशिया पॅसिफिक सौर भौतिकशास्त्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सुर्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण संशोधन करणारे डॉ. मेघनाद सहा यांच्यावरील व्याख्यानात डॉ. चौधरी बोलत होते. सौर भौतिकशास्त्रात प्रसिद्ध असलेल्या "सहा समिकरणां'ची शंभरी आणि डॉ. सहा यांचे 125वे जन्मवर्ष म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (ता.7) पर्यंत चालणाऱ्या या परिषदेला आशिया खंडातून शास्त्रज्ञ सहभागी झाले आहे.

डॉ. चौधरी म्हणाले, "आधुनिक विज्ञानातील क्रांतीची सुरवात ही युरोपात झाली. भारतामध्ये कोणतीही वैज्ञानिक परंपरा, साहित्य, सल्लागार आणि संसाधने नसतानाही विज्ञानाला कलाटणी देणारे संशोधन त्याकाळात झाले. 1920मध्ये सहा समीकरणे, 1924 मध्ये बोस स्टॅटीस्टीक आणि 1928मध्ये नोबेल विजेते रामन परिणामाचे संशोधन भारतात झाले. त्यावेळी युरोप आणि भारत वगळता फक्त अमेरिकेत 1923मध्ये कॉम्प्टन परिणामाचे संशोधन झाले होते.'' 

सूर्याशी निगडित मूलभूत संशोधनाचा पाया डॉ. सहा यांनी मांडलेल्या 'सहा समिकरणां'वर रचला गेला आहे. भारतात असतानाच त्यांनी थर्मल आयोनायझेशन, सूर्याचे तापमान आदींशी निगडित सिद्धांतातही मांडणी केली. युरोपमध्ये गेल्यावर त्यांचे लागोपाठ चार शोधनिबंध प्रकाशित झाले. पुन्हा भारतात येऊन त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाने पुढचे संशोधन करायचे ठरवले, पण त्यांना तत्कालीन परिस्थितीत शक्‍य झाले नसल्याचे डॉ. चौधरी म्हणाले. 

विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या कालखंडात देशात विद्वान वैज्ञानिक होते, परंतू प्रयोगांसाठी योग्य संसाधनांचा अभाव होता. तेंव्हा जर प्रयोगांसाठी संसाधने असती तर एकामागून एक शोध भारतात लागले असते. 
- डॉ. अर्नब रॉय चौधरी 

डॉ. मेघनाद सहा यांचा अल्पपरिचय :

- जन्म : 6 ऑक्‍टोबर 1893 (शरतोली, ढाका) मृत्यू : 16 फेब्रुवारी 1956.
- वयाच्या 28व्या वर्षाच्या आधी विज्ञानाला कलाटणी देणारे चार शोधनिबंध प्रसिद्ध 
- 1927मध्ये रॉयल सोसायटीचे फेले 
- 1952मध्ये संसदेत खासदार म्हणून निवड 
- वर्ष 1930, 1937, 1939, 1940, 1951 आणि 1955 असे तब्बल सहा वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामनिर्देशीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com