जेईई, नीट परीक्षा पुढे ढकला; का होतीय अशी मागणी?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

- 'विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सरकार घेणार का जबाबदारी', पालकांचा सवाल
- इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशनने केंद्रीय मंत्रालयाला पाठवले पत्र

पुणे : देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठीच्या जेईई, नीट या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी इंडिया वाइड पेरेंट्स असोसिएशनने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे केली आहे. या परीक्षा पुढे न ढकलल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही असोसिएशनने दिला आहे.

- धक्कादायक! पुण्यात सुरू असलेल्या प्रकारामुळं कोरोनाला मिळतंय आमंत्रण; काय आहे हे प्रकरण?

देशात सध्या जवळपास पावणे पाच लाखांहून अधिक कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे १५ हजारांहुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दरवर्षी साधारणतः दहा लाख विद्यार्थी जेईई, तर १५ लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता; सध्याच्या काळात या परीक्षा पुढे ढकलणे योग्य ठरणार आहे, असे असोसिएशनच्या अध्यक्षा अनुभा सहाय यांचे म्हणणे आहे.

- पुण्यात आणखी एक आत्महत्येची घटना; अकाउंटंट तरुणीने घेतला गळफास

या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारे निवेदन सहाय यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठविले आहे. त्या म्हणाल्या, "परीक्षा घेताना कितीही काळजी घेतली तरीही विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. आयआयआयटीतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी पदवीपूर्व प्रवेश परीक्षेत सामाजिक आणि शारीरिक अंतर राखण्यात आलेले अपयश समोर असताना, त्यापेक्षा मोठ्या संख्येने परीक्षार्थी असणाऱ्या या दोन्ही परीक्षा आता घ्याव्यात का, याचा विचार झाला पाहिजे.

- शाळा सुरू करण्याबाबत देशभरातील मुख्याध्यापक काय म्हणताहेत? वाचा सविस्तर!

त्याशिवाय देशातील वाहतूक व्यवस्था अद्याप पुर्ववत झालेली नाही. अशात परीक्षेसाठी काना-कोपऱ्यातून परीक्षा केंद्रावर विद्यार्थी कसे पोचणार, याबाबत ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. जे विद्यार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य कोरोनाग्रस्त असल्यास हे विद्यार्थी परीक्षा कसे देणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तीर्ण आहे. देशभरातील विविध शिक्षण मंडळाच्या परीक्षा रद्द झाल्या असून स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मग जेईई आणि नीट परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा विचार व्हावा."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परीक्षा देण्यासाठी प्रवास करणाऱ्या किंवा परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री सरकार देणार का? किंवा काही अनुचित घडल्यास त्यांची जबाबदारी सरकार स्वीकारणार का?, असा प्रश्नही सहाय यांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Wide Parents Association demanded to Ministry of HRD to postpone the JEE and NEET exams