धक्कादायक! पुण्यात सुरू असलेल्या प्रकारामुळं कोरोनाला मिळतंय आमंत्रण; काय आहे हे प्रकरण?

अनिल सावळे
शनिवार, 27 जून 2020

काही बाधित व्यक्तींकडून विलगीकरण कक्षात राहण्याबाबत नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या शेजारच्या आणि परिसरातील नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे : कोरोना बाधित रुग्णावर उपचार केल्यानंतर लक्षणे असूनही पाच-सहा दिवसांतच बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांना घरीच विलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

- पुण्यात आणखी एक आत्महत्येची घटना; अकाउंटंट तरुणीने घेतला गळफास

पुणे महापालिका आणि हवेली, दौंड, मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर पाच-सहा दिवसांतच घरी पाठविण्यात येत आहे. त्यांना घरीच स्वतंत्र विलगीकरण कक्षात (आयसोलेशन) राहण्यास सांगितले जाते. परंतु घरात बाधित व्यक्ती आल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

इतकेच नव्हे तर काही बाधित व्यक्तींकडून विलगीकरण कक्षात राहण्याबाबत नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या शेजारच्या आणि परिसरातील नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी प्रशासनाने कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष वाढविण्याची गरज आहे. परंतु या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. 

- कौतुकास्पद! कोरोना संकटात 'शेल्टर'ने दिले 12 हजार कुटुंबांना शेल्टर

घरी पाठविण्याऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये ठेवा

बाधित रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतरच घरी पाठवण्यात यावे. परंतु बाधित रुग्णांना पाच-सहा दिवस उपचार केल्यानंतर घरी पाठवायचे असल्यास कोविड केअर सेंटरमध्ये आयसोलेशनमध्ये सात दिवस ठेवून उपचार करावेत, अशी मागणी केली जात आहे.

कंटेनमेंट झोन जाहीर, नागरिक रामभरोसे : 
एखाद्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर ती गृहनिर्माण सोसायटी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जाते. त्यानंतर ग्रामपंचायतीकडून फवारणी केली जाते. काही  ग्रामपंचायतींनी रुग्णांची संख्या वाढूनही विलगीकरण कक्षच सुरू केलेले नाहीत. नागरिकांची व्यवस्थित आरोग्य तपासणी केली जात नाही. आरोग्य विभागाचे कर्मचारी आलेच तर केवळ कॅल्शियम आणि झिंकच्या गोळ्या दिल्या जातात. प्रशासनातील अधिकारी तर फिरकतच नसल्याचे वास्तव उदाहरणे आहेत.

रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात पुरेशा खाटा नसल्यामुळे आता उपचारानंतर पाच-सहा दिवसांतच घरी पाठविण्यात येत आहे. त्या रुग्णाला घरीच विलगीकरण करून राहण्यास सांगितले जाते. त्याला पर्याय नाही, असे आरोग्य विभागातील एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

- शाळा सुरू करण्याबाबत देशभरातील मुख्याध्यापक काय म्हणताहेत? वाचा सविस्तर!

उपाययोजनांची गरज : 
 - रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, खाटांची संख्या वाढविण्यात यावी 
- म्हाळुंगे केअर सेंटरच्या धर्तीवर जिल्ह्यात इतर ठिकाणी केंद्र सुरू करावेत
- प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंटेनमेंट झोनला भेट देऊन पाहणी करावी
- ग्रामीण भागात विलगीकरण कक्ष सुरू करावेत
- आरोग्य विभागाकडून योग्य पद्धतीने तपासणीची गरज

पुणे ग्रामीण स्थिती (कंसात खाटांची संख्या) :
कोविड रुग्णालये : 5 (1130)
कोविड आरोग्य केंद्र : 19 (1054)
कोविड केअर सेंटर : 48  (9399)

पुणे ग्रामीणमधील रुग्णसंख्या : 833
बरे झालेले रुग्ण : 508 
मृत्यू : 33 
उपचार सुरू रुग्ण : 270 
कंटेनमेंट झोन : 133


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Doctors Discharge to corona patients within five to six days and Advice to stay in home quarantine