- नितीन बिनेकर
मुंबई - मुंबई-पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास जलद आणि अडथळारहित करण्यासाठी रेल्वेने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. सुमारे नऊ हजार कोटींहून अधिक खर्चाची कर्जत ते तळेगावदरम्यान चौथी आणि पाचवी नवी मार्गिका उभारण्यात येणार आहेत.
या नव्या मार्गिकेमुळे प्रवासाचा कालावधी २० ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे. विशेष म्हणजे या मार्गात देशातील सर्वात लांब तब्बल ३० किमीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार असून तो रेल्वे बोर्डाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
कर्जत ते तळेगावदरम्यान बांधण्यात येणारी चौथी-पाचवी नवी रेल्वे मार्गिका सुमारे ६० किमी लांबीची असणार आहेत. यामध्ये ४३ किमीचे बोगदे प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे त्यातील एक बोगदा तब्बल ३० किमी लांबीचा असून तो देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा ठरणार आहे.
या प्रकल्पासाठी साडेनऊ हजार कोटींचा निधी लागणार असून, काम पूर्ण होण्यासाठी सहा वर्षे लागणार आहे. सध्या या प्रकल्पाचा अंतिम आराखडा रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे. या अंतिम आराखडा रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे.
वेळ आणि इंधन वाचणार
सध्या लोणावळा घाटात रेल्वेगाड्यांना अतिरिक्त इंजिन जोडावे लागते. इंजिन जोडण्यासाठी आणि काढण्यासाठी २० मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाढतोच, शिवाय इंधन आणि संसाधनांचाही अतिरिक्त खर्च होतो.
नव्या मार्गिकांमुळे या अडचणी दूर होणार असून,रेल्वेगाड्या सहजरित्या घाट पार करू शकतील. तसेच मुंबई-पुणेदरम्यान प्रवासाचा वेळ २० ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे. याशिवाय मालवाहतुकीसाठीही ही मार्गिका फायदेशीर ठरणार असून दळणवळणाचा खर्च वाचल्याने उद्योग साखळीला गती मिळणार आहे.
प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत
रेल्वेने या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून अंतिम आराखडा तयार केला आहे. तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. ती मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्याच अनुषंगाने कर्जत ते खोरावडी दरम्यानही चौथी व पाचवी मार्गिका प्रस्तावित असून, ६१ किमीच्या या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे; मात्र त्याचा अंतिम आराखडा अद्याप सादर झालेला नाही. या मार्गामुळे मुंबई-नाशिक प्रवासही अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे.
‘मेट्रो ७-अ’ बोगद्याचे काम पूर्ण
मुंबई - मुंबईसह एमएमआर क्षेत्रात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रोचे जाळे उभारण्याच्या मार्गातील आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे. दहिसर ते गुंदवलीदरम्यान धावणारी मेट्रो मार्गिका पुढे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत नेण्यासाठी उन्नत आणि भुयारी अशी साडेतीन किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे.
त्यातील दीड किमीच्या बोगद्याचे काम गुरुवारी (ता. १७) पूर्ण झाले असून त्याबाबतचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामुळे लवकरच मेट्रोने दहिसरहून थेट आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.