
Video : प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्याचं नेहरुंच्या हस्ते झालं होतं अनावरण
सातारा : महाराष्ट्राच्या इतिहासातील एका महत्वाच्या घटनेचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडावर (Pratapgad Fort) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावर ३० नोव्हेंबर १९५७ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Neharu) यांच्या हस्ते झालं होतं. यावेळी नेहरुंनी उपस्थितांसमोर भाषण करताना शिवरायांप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. लहानपणापासून शिवाजी महाराजांचं आपल्या जीवनात महत्वाचं स्थान असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ६५ वर्षांपूर्वीच्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Jawaharlal Nehru inaugurating the statue of Shivaji Maharaj on Pratapgarh fort Satara)
या ओरिजनल व्हिडिओनुसार, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक समितीच्यावतीनं भव्य स्वागत झालं होतं. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत स्मारक समितीचे सभासद तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई, गणपतराव सपासे, किसनवीर, डी. एस. जगताप, बाबासाहेब शिंदे होते. तसेच छत्रपती सुमित्राराजे भोसले या याप्रसंगी स्वागताध्यक्ष होत्या. मालोजीराजे नाईक-निंबाळकर हे देखील यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा: महाराष्ट्र कधी होणार पूर्ण अनलॉक? टास्क फोर्सच्या प्रमुखांची माहिती
दरम्यान, उपस्थित मोठ्या जनसमुदयासमोर माजी पंतप्रधान नेहरुंनी भाषणंही केलं होतं. ते म्हणाले होते, "लहानपणापासून शिवाजी महाराजांप्रती माझ्या हृदयात मोठं स्थान होतं. देशातील काही निवडक महापुरुषांमध्ये त्यांची गणना होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे महापुरुष होते. कोणत्याही भारतीयासाठी जो कोणत्याही प्रांतात राहत असला, कुठल्याही जाती-धर्माचा असला तरी प्रत्येकासाठी शिवाजी महाराजांचे विचार महत्वाचे आहेत, त्यांच्याकडून आपण धडा घेतला पाहिजे"
हेही वाचा: जम्मू काश्मीर: देशसेवा बजावताना शिगावच्या रोमित चव्हाणांना वीरमरण
महाबळेश्वरच्या डोंगररांगांमध्ये शिवाजी महाराज यांनी बुलंद किल्ला (प्रतापगड) बांधला होता. याच किल्ल्याच्या पायथ्याशी सन १६५९ मध्ये शिवाजी महाराज आणि अफझलखानाची ऐतिहासिक भेट झाली होती. या भेटीदरम्यान, अफझलखानानं महाराजांशी दगाफटका केला, पण संपूर्ण तयारीनिशी भेटीसाठी गेलेल्या महाराजांनी आपल्या हातातील वाघनख्यांनी अफझल खानाचा खात्मा केला होता.
Web Title: Jawaharlal Nehru Inaugurating The Statue Of Shivaji Maharaj On Pratapgarh Fort Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..