Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात सुमारे 5 लाख किमतीचे दागिने चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bageshwar Dham Baba Dhirendra Shastri

Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात सुमारे 5 लाख किमतीचे दागिने चोरीला

काल मुंबईजवळील मीरा रोड येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दिव्य दरबारावेळी चोरट्यांनी चांगलाच डल्ला मारला आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान कार्यक्रमात सहभागी महिलांचे सुमारे 4 लाख 87 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची माहीती समोर आली आहे.

काल (शनिवारी) मीरा रोड परिसरात बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्य दरबार भरला होता. बागेश्वर सरकार यांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे लाखो अनुयायी या कार्यक्रमाला पोहोचले होते. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम सुरू झालेला आणि रात्री 9.30 वाजता हा कार्यक्रम संपला.

बागेश्वर धामच्या कार्यक्रमावेळी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 36 महिलांनी मंगळसूत्र आणि गळ्यातील चैन चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांमध्ये दाखल केल्या आहेत.

महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 87 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत सध्या काही जणांची पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.

या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मीरा रोड येथे धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा 18 आणि 19 मार्च असा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल (शनिवारी) दिव्य दरबार भरला आणि रविवारी दुसऱ्या दिवशी आशीर्वाद आणि विभूती वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.