अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाली

अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाली

आळंदी -  सनईचा मंजूळ स्वर...फुलांची आकर्षक सजावट...अन्‌ समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून ११ ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रघोषात कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींना आज लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंचामृताने विधिवत पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर माउलींचे सजविलेले आकर्षक रूप डोळ्यात साठवत उपस्थित वारकऱ्यांनी केलेल्या माउलीऽ माउलींच्याऽऽ जयघोषाने अलंकापुरी दुमदुमून गेली.

ज्ञानराज माझी योग्यांची माउली,
जेणे निगमवल्ली प्रगट केली.
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी,
ब्रह्मानंद लहरी प्रगट केली,

फोटो फीचर पाहण्यासाठी क्लिक करा

ही भावना उरी ठेवून राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत आले आहेत. कार्तिकी वारी माउलीचरणी समर्पित करण्यासाठी आलेल्या सुमारे साडेतीन लाख वारकऱ्यांच्या अखंड हरिनामाने अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. कार्तिकी वारी आणि माउलींच्या ७२३ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी आलेल्या या वारकऱ्यांच्या भक्तीने कार्तिकीचा सोहळा आज सजला होता. वारकऱ्यांची गर्दी रविवारी सायंकाळपासून वाढली. देऊळवाड्याच्या पश्‍चिमेकडील दर्शनमंडपातून येणारी दर्शनाची रांग रात्री साडेअकराला माउलींच्या पवमान पूजेसाठी बंद ठेवली. मानकरी, पुजारी आणि पोलिसांनी पवमान अभिषेकासाठी देउळवाडा रिकामा करून घेतला. स्वकाम सेवा मंडळाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण देऊळवाडा स्वच्छ केला. घंटानाद झाल्यानंतर पावणेबारा ते सव्वाएकपर्यंत माउलींना पवमान अभिषेक करण्यात आला. सनई-चौघड्यांचा मंजूळ स्वर आणि पुजारी राहुल जोशी यांच्यासह अकरा ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चाराने देऊळवाड्यातील वातावरण मंगलमय झाले होते. दरम्यानच्या काळात सिद्धेश्वर मंदिरातही मंदार जोशी यांच्या आधिपत्याखाली रुद्राभिषेक सुरू होता. माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून माउलींना पंचामृत अभिषेक करण्यात आला. नंतर माउलींच्या समाधीवरील चांदीचा मुखवटा मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून सजविण्यात आला. आरतीनंतर मानकरी आणि सेवेकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आला. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे,

अजित कुलकर्णी, पिंपरीचे महापौर राहुल जाधव, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, राहुल चिताळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आरतीनंतर दीडच्या सुमारास समाधीदर्शनासाठी कारंजे मंडपातील निमंत्रित पासधारकांना सोडले. अर्धा तासाच्या अंतराने भाविकांना सोडले. 

बुधवंत दांपत्याला प्रथम दर्शन 
पहाटपूजेनंतर पाथर्डीच्या शिरापूरमधील कौसल्या बुधवंत आणि तुकाराम बुधवंत या शेतकरी दांपत्याला दर्शनाचा मान मिळाला. देवस्थानच्या वतीने ज्ञानेश्वरी व माउलींची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून दांपत्य वारी करत आहेत. दर्शनबारीत सात तास उभे राहिल्यानंतर त्यांना दर्शनाचा लाभ घेता आल्याचे बुधवंत यांनी सांगितले.

पोलिसांकडून दिवसभर अडवणूक
पहाटपूजेसाठी महाद्वारातून जाणाऱ्या फोटोपासधारक निमंत्रितांची बंदोबस्तावरील पोलिसांनी अडवणूक केली. देवस्थानच्या शिपायाला धक्काबुक्की केली, पूजेवेळी देऊळवाड्यात प्रवेश केल्यानंतर नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचे पती अशोक कांबळे यांनाही कारंजे मंडपात शिरताना पोलिसांनी अडविले. यात्रा समितीच्या सभापती पारूबाई तापकीर यांनाही बाहेरच ताटकळत थांबावे लागले. नंतर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवेश दिला. पोलिसांची ही अडवणूक दिवसभर सुरू असल्याने अनेक निमंत्रितांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात नाराजी दर्शविली.

‘साम’वर आजपासून ‘ज्ञानियांचा राजा’
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीवर आधारित ‘ज्ञानियांचा राजा’ ही विशेष मालिका मंगळवार (ता. ४) ते गुरुवार (ता. ६)दरम्यान दररोज दुपारी साडेतीनला प्रक्षेपित होणार आहे. या मालिकेतून भाविकांना आळंदीतील सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे. या मालिकेचे मुख्य प्रायोजक विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com