ठेविले अनंते तैसेचि रहावे| चित्ती असो द्यावे समाधान...‘दशसूत्री’चे पालन करा, डिप्रेशनपासून दूर राहा

चिमुकल्यांवर पालकांचे अपेक्षांचे जास्त ओझे आणि त्यातून आलेले अपयश, घरात आई-वडिलांची सततची भांडणे, मुलांना वेळ न देणे ही लहान मुलांच्या डिप्रेशनची प्रमुख कारणे आहेत. आपल्या मुलांमधील बदल पालकांनी वेळीच ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास निश्चितपणे नैराश्यापासून ते दूर राहतील, असे आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.
Happy Life
Happy Life sakal

सोलापूर : बेरोजगारीमुळे निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा, आर्थिक चणचण, एकमेकांसोबत दुरावलेले नातेसंबंध, अपयशानंतर स्वतःला कमी लेखणे, नापास होणे, व्यवसायात नुकसान तथा तोटा, पती-पत्नीचे न पटणे, घटस्फोट, कामाचा ताण, सततचा शारीरिक आजार ही तरुणांमधील नैराश्याची कारणे आहेत. तर चिमुकल्यांवर पालकांचे अपेक्षांचे जास्त ओझे आणि त्यातून आलेले अपयश, घरात आई-वडिलांची सततची भांडणे, मुलांना वेळ न देणे ही लहान मुलांच्या डिप्रेशनची प्रमुख कारणे आहेत. आपल्या मुलांमधील बदल पालकांनी वेळीच ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास निश्चितपणे नैराश्यापासून ते दूर राहतील, असे आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.

नैराश्य इथेच ओळखा...

  • - सतत उदास किंवा चिंतेत राहणे, आपले कसे होईल, अशी सतत चिंता वाटणे.

  • - कशातही रस किंवा गोडी नसणे, कोणत्याही छंदामध्ये आनंद न वाटणे.

  • - थकवा किंवा ऊर्जा कमी वाटणे व भूक न लागणे किंवा जास्तच भूक लागणे.

  • - बैचेनी वाटणे, आपण असहाय्य व एकटेच असल्याचा विचार येणे.

  • - कामात लक्ष न लागणे, काहीवेळापूर्वीचे लक्षात न राहणे, लवकर निर्णय न घेणे.

  • - झोप न लागणे, सकाळी लवकर जाग येणे किंवा जास्त झोपणे.

  • - चिडचिडेपणा, अपराधीपणाची भावना, आत्महत्येचे विचार येणे, तसा प्रयत्न करणे.

  • - डोकेदुखी, अंगदुखी, अपचन, शौचाला साफ न होणे व विनाकारण रडू येणे.

  • - आपण काहीतरी चूक केली आहे, पाप केल्याचे विचार येणे.

नैराश्याला कोणतेही वय नसते

नैराश्य हे कोणत्याही वयामध्ये येऊ शकते. पालकांच्या अपेक्षांचे ओझे वाढल्याने लहान मुले त्याचे शिकार होत आहेत. दुसरीकडे वय वाढत असतानाही २२ ते २५ वर्षांच्या मुलांना नोकरी नाही. त्यामुळे तरुणांनाही नैराश्य गाठत आहे. तसेच शासकीय विभागांमध्ये रिक्तपदे वाढल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काम वाढले आहे. त्यामुळे त्यांच्यातही नैराश्याची भावना निर्माण होत आहे. डिप्रेशनसोबतच डायबेटिस, रक्तदाब, हृदयविकार असे आजार होण्याची शक्यता अधिक असते. नैराश्याचा आजार बरा होऊ शकतो. औषधोपचार व मानसोपचार तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतल्यास हा आजार ठीक होतो.

डिप्रेशन टाळण्यासाठी ‘या’ दशसूत्रीचा अवलंब करा

  • - नियमित सात ते आठ तास झोप व किमान अर्धा तास तरी व्यायाम करा.

  • - सकारात्मक बोला व वाचा, नेहमी सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा.

  • - आवडते काम किंवा उद्योगात सतत गुंतून राहा.

  • - परीक्षा किंवा स्पर्धेत अपयश आल्यास पुन्हा प्रयत्न करा, यश नक्की मिळेल, असे ठामपणे सांगा.

  • - मुलांमधील चांगले गुण व कला हेरून त्याला प्रोत्साहन द्यावे, विनाकारण जास्त अपेक्षा नकोच.

  • - पालकांनी आम्ही तुझ्यासोबत असल्याचे सांगून मुलांना आत्मविश्वास द्यावा.

  • - मुलांच्या बुद्धीचा पुरेपूर वापर व्हावा, सर्व अवयवांची हालचाल होण्यासाठी त्यांना मोबाईल देऊ नये.

  • - खेळाने शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती वाढते, त्यामुळे मुलांचे छंद, आवड जोपासावी.

  • - मुलांच्या वयोमानानुसार त्यांना वेगवेगळ्या प्रेरणादायी गोष्टींची पुस्तके वाचायला द्यावीत.

  • - उन्हाळा सुटीत जास्त झोप नको, सूर्योदयावेळी उठावे आणि सूर्यास्तापूर्वी झोपावे.

मनसोक्त खेळा, कला व छंद जोपासा

सकारात्मक विचार हाच नैराश्यावरील रामबाण उपाय आहे. कमी यश मिळाले तर समाधान महत्त्वाचे आहे. पुन्हा प्रयत्न करता येतील, पण निराश, हताश होवू नका. मनसोक्त खेळ खेळा, कला, छंद जोपासा, नियमित थोडासा तरी व्यायाम करावा. पालकांनी लहान मुलांवर अपेक्षांचे ओझे जास्त द्यायला नको. जेणेकरून त्यांना नैराश्य येणार नाही.

- डॉ. विणा जावळे, प्राचार्य, शेठ गोविंद रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय, सोलापूर

‘ठेविले अनंते तैसेचि रहावे| चित्ती असो द्यावे समाधान...

तुकाराम महाराज म्हणतात, 'ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ll'या उक्तीप्रमाणे जो वागतो, त्याला आयुष्यच सार समजल्याने तो सुखी जीवन व्यतीत करतो. शेवटी एवढंच, आयुष्यात समाधानी असणे खुप महत्वाचे आहे. जो व्यक्ती समाधानी आहे, त्यालाच सुख प्राप्ती होते. म्हणूनच आयुष्यात नेहमी समाधानी रहायला शिका. अपेक्षा जरूर ठेवा, पण त्याच ओझं होऊन परिस्थिती बिघडण्याच्या अगोदरच त्यावर नियंत्रण ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com