अंगणवाड्यांच्या चाव्या ग्रामसेवकांच्या हाती! सोलापूर झेडपी सीईओंनी काढला तोडगा; स्तनदा, गरोदर मातांसह चिमुकल्यांच्या आहाराची मिटणार चिंता

सरपंच, अंगणवाडी ज्या प्रभागात आहे तेथील महिला सदस्या, ग्रामसेवक, अंगणवाडीची मुख्यसेविका या समितीच्या मदतीने २५ दिवसांपासून बंद असलेल्या अंगणवाड्या आता उघडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांपासून दूर अंतरावरील अंगणवाड्यांच्या चावी ग्रामसेवकांकडे असणार आहेत.
solapur zp ceo manisha awhale
solapur zp ceo manisha awhale sakal

सोलापूर : गावचे सरपंच, अंगणवाडी ज्या प्रभागात आहे तेथील महिला सदस्या, ग्रामसेवक, अंगणवाडीची मुख्यसेविका या समितीच्या मदतीने २५ दिवसांपासून बंद असलेल्या अंगणवाड्या आता उघडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांपासून दूर अंतरावरील अंगणवाड्यांच्या चावी ग्रामसेवकांकडे असणार आहेत. या समितीच्या मदतीने अंगणवाड्या सुरू करण्याचा निर्णय सोलापूर झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतला आहे. अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे निर्माण झालेली अडचण दूर करणारी सोलापूर झेडपी राज्यात पहिलीच आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या ३ ते ६ वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांची संख्या एक लाखांवर असून, सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतची मुले जिल्ह्यात एक लाख सात हजार आहेत. स्तनदा माता व गरोदर महिलांची संख्या ३७ हजारांपर्यंत आहे. या सर्वांना एकात्मिक बालविकास विभागातर्फे नियमित पोषण आहार दिला जातो. पण, सध्या अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस कर्मचारी मागील २५ दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहेत. शुक्रवारी (ता. २९) त्यांनी साखळी आंदोलन केले.

दरम्यान, स्तनदा माता, गरोदर महिला व सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना डिसेंबरपर्यंत आहार घरपोच केला आहे. पण, आता जानेवारी- फेब्रुवारीचा आहार आला असतानाही कर्मचारी नसल्याने वाटप झालेला नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गटविकास अधिकारी, प्राथमिक शिक्षणकडील विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखांची बैठक घेतली. त्यात अंगणवाड्या बंद असल्याने पर्यायी उपाययोजना करून जिल्हा परिषद शाळांच्या मदतीने संबंधितांना आहार देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हा परिषदांच्या आवारात भरणाऱ्या एक हजार ७९१ अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना झेडपी शाळांवरील शिक्षक दररोज एक तास शिकवणार आहेत. स्तनदा माता, गर्भवतींना आहार आशासेविकांमार्फत पुरविला जाणार आहे. उर्वरित २२८५ अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना आशासेविकांच्या मदतीने आहार पुरविला जाणार आहे.

जिल्ह्यातील अंगणवाड्यांची स्थिती

  • एकूण अंगणवाड्या

  • ४,०७६

  • ६ महिने ते ३ वर्षांपर्यंतची मुले

  • १,०६,८१३

  • ३ ते ६ वर्षांपर्यंतची मुले

  • १,०१,०४१

  • गरोदर महिला

  • १८,५५१

  • स्तनदा माता

  • १८,३०८

आशासेविका मदत करतील का?

आरोग्य विभागाकडील आशासेविकांच्या मदतीने स्तनदा माता व गर्भवतींसह सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना घरपोच आहार देण्याचे नियोजन आहे. पण, राज्य सरकारने आशासेविकांचे मानधन वाढीचा निर्णय जाहीर करूनही शासन निर्णय न निघाल्याने त्यांनीही १२ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीसांची कामे आशासेविका करतील का, याबद्दल संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात अंगणवाडी सेविका- मदतनीस यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील चिमुकल्यांचे शिक्षणाची व बालक, गर्भवती महिलांचे लसीकरण, स्तनदा माता, गर्भवतींच्या आहाराची गैरसोय होवू शकते. त्यामुळे राज्य सरकारला आता दोन्ही विषय सामोपचाराने मिटवावेच लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com