'परबांचं रिसॉर्ट केव्हा पाडणार?'; सोमय्यांचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

konkan

रिसॉर्ट बांधण्यासाठी ५०४ मीटरची परवानगी देण्यात आली होती.

'परबांचं रिसॉर्ट केव्हा पाडणार?'; सोमय्यांचा सवाल

रत्नागिरी : पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टचा अकृषिक परवाना (एनए) बेकायदेशीर असल्याचे जिल्हाधिकारी व महसूल सचिवांनी लोकायुक्तांच्या समोरील सुनावणीत मान्य केले. आता तो परवाना परत घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही सांगितले आहे. या परिस्थितीत मंत्री परब यांचे रिसॉर्ट केव्हा पाडणार, असा प्रश्‍न भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

सोमय्या म्हणाले, ‘‘पालकमंत्री परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने अनेक वेळा दिले आहेत, तरीही जिल्हाधिकारी ते पाडत नाहीत. महाराष्ट्र कोस्टल झोन अ‍ॅथॉरिटी यांनी चार महिन्यांपूर्वीच हे रिसॉर्ट अनधिकृत आहे, ‘सीआरझेड’मधील ना विकास क्षेत्रात (नो डेव्हलपमेंट झोन) बांधण्यात आले आहे म्हणून ते तोडावे, असे निर्देश दिले होते. लोकायुक्तांच्या समोरील सुनावणीत रत्नागिरी जिल्हाधिकारी व महसूल सचिवांनीही या रिसॉर्टचा अकृषिक परवाना बेकायदेशीर असल्याचे मान्य केले आहे. तो परत घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. रिसॉर्ट बांधण्यासाठी ५०४ मीटरची परवानगी देण्यात आली होती. पण फसवणूक, फोर्जरी करून १७ हजार ८०० चौरस फुटांचे दुमजली रिसॉर्ट बांधण्यात आले. एमआरटीपी कायद्याच्या अंतर्गत या संबंधात रिसॉर्ट बांधणाऱ्यावर कारवाईचे आदेशही देण्यात आले. तरीही कारवाई केली जात नाही.’’

नोव्हेंबर २०१९ मध्ये २०१९-२० ची आणि डिसेंबर २०२० मध्ये २०२०-२१ या वर्षाची घरपट्टी मंत्री परब यांनी स्वतःच्या नावाने बँक खात्यामधून भरली आहे. या रिसॉर्टसाठी लागणारा थ्री फेज विद्युत परवाना महावितरणकडून स्वतःच्या नावावर मार्च २०२० मध्ये त्यांनी घेतला आहे. लोकायुक्तांकडे राज्य सरकारने हे मान्यही केले आहे. ते पाडण्याचे आदेश देण्याची कबुली दिली आहे. तरीही ते का पाडले जात नाही. याचा जाबही जिल्हाधिकाऱ्यांना विचारला, असे श्री. सोमय्या यांनी सांगितले. याविषयी लोकायुक्तांकडे ७ डिसेंबरला पुढील सुनावणी असून त्या वेळी गृह विभागाच्या सचिवांनाही बोलावण्यात आल्याचे सोमय्यांनी सांगितले. मंत्री परब यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठीशी घालत आहेत. कोविडमध्ये लोक मरत असताना परब रिसॉर्ट बांधत होते. अशा मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे. परब यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी संपूर्ण ताकद पणाला लावू, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: अनिल परब फक्त टाईमपास करताहेत, 4 तास चर्चा करत होते की, ...

अलिबाबा चाळीस चोरांची यादी तयार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जवळच्या भ्रष्टाचारी लोकांचे घोटाळे उघडकीस आणत राहणार. आतापर्यंत ठाकरे सरकारमधील चारजण जामिनावर आहेत. सरकारमधील अलिबाबा चाळीस चोरांची यादी तयार असून एकेकाचा नंबर येईल तसे मी जाहीर करेन, असे सांगून ठाकरे आणि पवार यांनी आता तरी नौटंकी थांबवली पाहिजे, असा सल्ला सोमय्या यांनी दिला. मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जमीन घोटाळ्यासंदर्भात उद्या (ता. २४) मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

loading image
go to top