
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या एका उमेदवाराच्या पराभवानंतर शिवसेनेच्या संजय राऊतांनी (Sanjay Raut) गद्दारी करणाऱ्या आमदारांना फटकारलं आहे. दरम्यान शिवसेनेला मत न टाकलेल्या आमदारांची नावे राऊतांनी जाहीर केले आहेत. त्यानंतर संजय राऊतांनी राज्यसभेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला आहे.
(Kirit Somaiya On Sanjay Raut)
संजय राऊतांना शिवसेनेला मत न दिलेल्या आमदारांची नावे कशी कळाली? असा सवाल त्यांनी राऊतांना केला आहे. तुम्ही सहा आमदारांची नावे कशी आणि का घेतली? ते तुमच्या स्वप्नात आले होते का? असे प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत. "शिवसेनेकडून आता निवडणुकांची माफियागिरी होत आहे, त्यांनी आमदारांची नावे कोणत्या आधारे घेतले आहेत?" असे सवाल त्यांनी माध्यमांसमोर उभे केले आहेत.
"काही छोटे पक्ष आहेत जे आपले उमेदवार उभे करू शकत नाहीत ते कुणालाही मतदान करू शकतात पण कुणी कुणाला मत दिले हे तुम्हाला कसं कळालं, किंवा निवडणूक आयोगाला तरी कसं कळालं? याचं उत्तर संजय राऊत यांना द्यावा लागणार आहे. याचा अर्थ शिवसेनेने आचारसंहितेचा आणि गोपनियतेचा भंग केला आहे." असे आरोप सोमय्यांनी केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची तक्रार दाखल केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला होता. हा पराभव शिवसेनेला चांगलाच जिव्हारी लागला आणि शिवसेनेच्या संजय राऊतांनी गद्दारी करणाऱ्या आमदारांची नावे जाहीर करून टाकली आहेत. "घोड्यांना चने टाकले की ते कुठेही जाऊ शकतात." अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आज भाजपवर जाहीर टीका करताना राऊत म्हणाले की, "आमच्या हातात दोन दिवस ईडी द्या, त्यानंतर फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील." अशी टीका करत राऊतांनी भाजपला डिवचलं होतं.