

Dinesh Goliya
esakal
कुंडल : येथील ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकाच्या लढतीत हरियाणाच्या हिंदकेसरी दिनेश गोलियाने महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखवर २६ व्या मिनिटाला ‘घुटना’ डावावर विजय मिळवून मैदान मारले. यंदाच्या मैदानात तब्बल चार महाराष्ट्र केसरी मल्लांना पराभवाची धूळ चाखावी लागली. तर महिला कुस्तीतही उत्तर भारतीय मल्लांनी वर्चस्व सिद्ध केले.
पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध हिंदकेसरी दिनेश गोलिया (हरियाणा) यांच्यात झाली. आठव्या मिनिटाला दिनेशने सिकंदरवर ताबा मिळवला, मात्र कुस्ती मैदानाबाहेर गेल्याने पुन्हा लावली. सिकंदरने ‘कुंडी’ डाव टाकून गोलियाला खाली घेण्याचा प्रयत्न केला; परंतु हा डाव उलटवून १९ व्या मिनिटाला दिनेशने पुन्हा ताबा मिळविला.
अखेर २६ व्या मिनिटाला दिनेश गोलियाने कब्जा घेत चपळाईने ‘‘घुटना’’ डावावर सिकंदर शेखला अस्मान दाखविले. प्रीतम लाड यांनी पंच म्हणून काम पाहिले. डबल महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर आणि भारत केसरी राजू रायवाल यांच्यात सुरुवातीला खडाखडी झाली. सदगीरने कब्जा मिळवला तरी राजू निसटला. अखेर १९ व्या मिनिटाला राजू रायवालने दुहेरी पट काढून विजय मिळविला. सुनील मोहिते यांनी पंच म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि राष्ट्रीय विजेता शुभम रायवाल यांच्यात तब्बल ४० मिनिटे झुंज झाली.
यात शुभमने एकचाक डावावर बाजी मारली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि लल्लू जम्मू यांच्यात रेंगाळलेली कुस्ती गुणांवर घेण्यात आली. ८ व्या मिनिटाला लल्लू जम्मूला विजयी घोषित करण्यात आले. दादा शेळके आणि भारत केसरी साहिल कोहली यांची कुस्ती १६ व्या मिनिटाला गुणांवर लावली जात असताना दादा शेळकेच्या खांद्याला दुखापत झाल्याने कुस्ती थांबविण्यात आली. या लढतीत साहिल याच्या खेळीने शौकिनांची मने जिंकली.
उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि पंजाबचा आंतरराष्ट्रीय मल्ल हदी इराण यांच्यातील लढत १२ मिनिटे रंगली. हदीने घेतलेला ताबा माऊलीने दुसऱ्याच मिनिटाला धुडकावला. पोकळ घिस्सा डावावर माऊलीने सनसनाटी विजय नोंदवत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सुबोध पाटील याने एकचाक डावावर महारूद्र काळेलचा पराभव केला. वैभव माने याने राष्ट्रीय पदक विजेत्या सुदर्शन कोतकरवर गुणांवर विजय मिळविला. सनी मदने (कुंडल) याने हप्पी डावावर पंजाबच्या गोगीला चितपट केले.
तर कुंडलच्याच ओंकार मदने याची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. मैदानात आशीष मस्के, विराज पाटील (देवराष्ट्रे) आणि प्रणव पडळकर या दिव्यांग मल्लांनी विजय मिळवत शौकिनांची वाहवा मिळविली. याशिवाय रोहित भोसले (पलूस), अमित चौगुले, ज्ञानदेव जाधव, विशाल शिंदे (क्रांती), अर्ष तांबोळी, प्रथमेश शिंदे, अनिकेत पाटील, कुणाल माने, रियाज मुलाणी, अजित पवार, ऋषिकेश मंडले, सुमित सूळ, नाथा पवार, भारत पवार व तेजस मोरे या पैलवानांनी चटकदार कुस्त्या करून कुस्ती शौकिनांची मने जिंकली. जोतिराम वाजे यांनी समालोचन केले.
जागतिक विजेती रीतिका हुड्डा हिने महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी हिचा गुणावर पराभव केला. जागतिक विजेती बिपाशा दाहिया हिने घिस्सा डावावर राष्ट्रीय पदक विजेत्या सई भोसलेला धूळ चारली. आश्लेषा बागडे हिने महाराष्ट्र चॅम्पियन रिया भोसलेला चितपट केले. राष्ट्रीय पदक विजेती प्रेरणा पाटील आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती सृष्टी भोसले यांची कुस्ती बरोबरीत सुटली. महिला कुस्तीतही उत्तर भारतीय मल्लांनी बाजी मारली. त्यांच्या खेळीपुढे महाराष्ट्रातील महिला मल्ल टिकाव धरू शकल्या नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.