

Dharashiv Crime
esakal
कळंब (जि. धाराशिव) : धुळे जिल्ह्यातील गरताडबारी घाट परिसरात पेट्रोल टाकून जाळून गर्भवतीचा खून केल्याची धक्कादायक घटना २२ सप्टेंबरला उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन दिवसांत छडा लावून कळंब येथील तिघांसह चौघा संशयितांना ताब्यात घेतले असून, दोन संशयित फरारी आहेत. धुळ्यातील मोहाडीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. २२ सप्टेंबरला गरताडबारी घाटातील टेकडीलगतच्या वनक्षेत्रात गर्भवतीचा जळालेला मृतदेह आढळला होता. महिलेची ओळख पटविण्यात अडचणी होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, सहायक निरीक्षक शरद बागल, मोहाडीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन करंडे, सहायक निरीक्षक अशोक पायमोडे आदींनी तपास सुरू केला. धुळ्याचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी तपासासाठी स्वतंत्र पथक तयार केले. पथकाने घटनास्थळापासून सुमारे वीस किलोमीटर परिसरात महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील ११ तास सलग फुटेज तपासले.
त्यावेळी संशयित कार (एमएच-४३, एआर-४०७०) पोलिसांच्या निदर्शनास आली. वाहनाच्या हालचालींचे विश्लेषण करण्यात आले. तपास पथक जामखेड (जि. अहिल्यानगर) येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रापर्यंत पोचले. तेथे संशयित पोलिसांच्या हाती लागले.
कलाकेंद्रातील वादातून खून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी केली असता, मृत महिलेची ओळख पटली. पिंकी हनुमंत काटकर (वय ३१, रा. रायगड, बीड) असे तिचे नाव असल्याचे स्पष्ट झाले. ती जामखेड येथील कला केंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करीत होती, असे तपासात समोर आले.
कला केंद्रातील अंतर्गत वादातून मांजरसुंबा चौफुली (ता.जि. बीड) येथे पिंकी काटकरला मारहाण करण्यात आली. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. तिचा मृत्यू झाल्याचे समजून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयितांनी तिचा मृतदेह वाहनात भरला व राजस्थानच्या दिशेने निघाले. रस्त्यात निर्जन ठिकाणी वाहन थांबवून महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले. त्यानंतर संशयित जामखेडकडे परतले.
या प्रकरणात पोलिसांनी सरफराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन (वय ३८), आरिफ ऊर्फ खुज्या आसिफ शेख (वय ३१), लक्ष्मी बालाजी पवार (वय ३०, तिघे कळंब), स्वाती ऊर्फ आरती गणेश कुन्हाडे (वय २८, जामखेड, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. महिलेसह दोघे फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे. खुनासाठी वापरलेली कार, तसेच संशयितांचे मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. खुनाचे नेमके कारण, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.