

Lakhan, the powerful bull crowned Double Hind Kesari, celebrates victory at the Sangli state-level bullock cart race, continuing his unbeatable legacy.
esakal
Lakhan Bull Creates History in Sangli Bullock Cart Race: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडीतील वाऱ्याच्या वेगानं सुसाट धावणाऱ्या ‘लखन’ नावाच्या बैलानं सांगलीत पार पडलेल्या ‘डबल हिंद केसरी’ राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत बाजी मारून फॉर्च्यूनर कार अन् चांदीची गदा पटकावली आहे. एवढंच नाहीतर आता लवकरच लखन आणि त्याच्या मालकाचा मुंबईत मुख्यमंत्र्यांकडूनही सत्कार होणार आहे.
आधीच तीनदा हिंद केसरी ठरलेल्या लखन बैलानं आता डबल हिंद केसरीचं मैदानही मारल्याने छत्रपती संभजानगर जिल्ह्याची राज्यात मान उंचावली आहे. लखनला मराठवाडा एक्स्प्रेस या टोपण नावानेही ओळखलं जातं.
चंद्रहार पाटील यांच्या आयोजनाखाली तासगाव-कौड्याचा मळा येथील तब्बल ५०० एकरांच्या विशाल मैदानावर झालेल्या या भव्य स्पर्धेत राज्यभरातून कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, पुणे, नाशिक आदी भागांतील हजारो बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला होता.
लाखो शौकिनांच्या उपस्थितीत रंगलेल्या या शर्यतीत करोडीचा लखन आणि कळमनुरीचा सर्जा या दमदार जोडीने आपल्या वेग आणि समन्वयाच्या जोरावर बाजी मारत फॉर्च्युनर कार व चांदीची गदा हा मानाचा बहुमान पटकावला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयासमोर होणार आहे.
करोडीचा लखन आणि कळमनुरीचा सर्जा या जोडीने हेलिकॉप्टर आणि ब्रेकफेल या नामांकित बैलजोड्यांनाही मागे टाकत विजय मिळवला. लखन व सर्ज्याने या पूर्वीही अनेक मानाचे किताब पटकावले आहेत. करोडी येथील सर्जेराव पाटील चव्हाण यांचा लखन हा आधीच तीन वेळा ‘हिंद केसरी’ किताब पटकावलेला आहे, तर हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील साईनाथ पाटील यांचा सर्जा हाही तीन वेळा ‘हिंद केसरी’ ठरलेला आहे.
सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय शंकरपट स्पर्धेत या जोडीने प्रारंभापासूनच आपल्या गतीने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अंतिम फेरीत अप्रतिम झेप घेत पहिला क्रमांक मिळवला. खरंतर लखनला अडीच वर्षांपूर्वी गजानन काळे यांच्याकडून ११ लाख ५५ हजार रुपयांत खरेदी करण्यात आले होते. सध्या लखनने २०० पेक्षा अधिक शर्यतींमध्ये विजय मिळवला असून, तो विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध स्पर्धांमध्ये चमकला आहे.
लखनच्या दैनंदिन खुराकात पाच लिटर गिर गायचे दूध, काजू, बदाम, गावरान अंडी यांचा समावेश आहे. त्याची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते आणि स्पर्धांकरिता विशेष पिकअप वाहनातून ने-आण केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.