esakal | Bird Flu: महाराष्ट्रात थैमान; दोन जिल्ह्यातील साडेसहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Bird_Flu

- पोल्ट्री फार्मपासून एक किलोमीटर त्रिज्येच्या अंतरातील कोंबड्या नष्ट करणार
- संसर्गग्रस्त क्षेत्रातील साडेसहा हजार कोंबड्या नष्ट करणार
- शिजवलेले चिकन किंवा अंडी खाणे धोकादायक नाही 

Bird Flu: महाराष्ट्रात थैमान; दोन जिल्ह्यातील साडेसहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील लातूर आणि परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे कोंबड्या मृत झाल्याचे समोर आले असून, प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. चिकन किंवा अंडी शिजवून खाल्ल्यानंतर मनुष्याच्या आरोग्याला अपायकारक नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत सांगितले.

पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. सुनील राऊतमारे, डॉ. विनायक लिमये आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे या वेळी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील सुखणी, अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी तसेच परभणी जिल्ह्यातील मुरुंबा याठिकाणी बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या परिसरातील एक किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील सुमारे साडेसहा हजार कोंबडी नष्ट करण्यात येणार आहेत. 

मोठी बातमी : बायडेन यांच्या शपथविधीवेळी दंगलीचा कट; FBI ने दिला अलर्ट​

राज्यातील यवतमाळ जिल्ह्यात दोनशे, अमरावती जिल्ह्यात 11 आणि अकोला जिल्ह्यातील तीन कोंबड्या मृत झाल्या आहेत. अकोला जिल्ह्यात चार कावळ्यांमध्ये मरतूक आढळून आली आहे. राज्यातील 218 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत आणि पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास आणखी काही कालावधी लागू शकतो. आठ जानेवारीपासून आतापर्यंत एक हजार 839 विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पूर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ येथून नुकतेच प्राप्त झाले आहेत. त्यानुसार मुंबई, घोडबंदर (जि.ठाणे) आणि दापोली याठिकाणी कावळे आणि बगळे तर परभणी जिल्ह्यातील मुरुंबा या ठिकाणच्या पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत.

लडाखमधील थंडीने चिनी सैनिकांना शिकवला धडा; 10 हजार सैनिकांना घेतलं मागे​

लातूर जिल्ह्यातील नमुनेही सकारात्मक आल्यामुळे हा परिसर संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तेथे प्रतिबंधक निर्देश लागू करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथील सुमारे साडेपाच हजार, अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील एक हजार कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पोल्ट्री फार्मपासून एक किलोमीटर त्रिज्येच्या अंतरामध्ये येणाऱ्या सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. तसेच मुंबई, घोडबंदर, दापोली आणि बीड येथे केवळ सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्या :
राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे आणि स्थलांतरित होणाऱ्या पक्षांमध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 18002330418 या क्रमांकावर दूरध्वनी करून त्याची माहिती द्यावी. 

युवक दिन विशेष : कौशल्यासह हवा काम करण्याचा दृढ निश्‍चय

परस्पर विल्हेवाट लावू नये :

बर्ड फ्लूमुळे मृत झालेल्या पक्ष्यांना हात लावू नये. शवविच्छेदन करू नये किंवा त्याची परस्पर विल्हेवाट लावू नये. बर्ड फ्लूचा उद्रेक झालेल्या ठिकाणी नियंत्रित करण्याकरिता राज्यातील प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.

शिजवलेले चिकन आणि अंडी खाण्यासाठी सुरक्षित : 

कोंबडी (चिकन) किंवा अंडी 70 अंश सेंटिग्रेड तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होतात. त्यामुळे अंडी आणि कोंबड्यांचे मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज किंवा अफवा पसरविण्यात येऊ नयेत, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी या वेळी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image