esakal | इंदिरा गांधी-करीम लाला भेट; राऊतांच्या 'या' वक्तव्यावर कोण काय म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

leaders said on sanjay rauts statement about Indira Gandhi Karim Lala meeting

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात राजकीय धुरळा उडाला आहे.

इंदिरा गांधी-करीम लाला भेट; राऊतांच्या 'या' वक्तव्यावर कोण काय म्हणाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात राजकीय धुरळा उडाला. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस पक्षाला अंडरवर्ल्ड फायनान्स करीत होते का, असा सवाल केला. यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांभाळून वक्‍तव्य करण्याचा सल्ला राऊत यांना दिला आणि फडणवीस यांनी राईचा पर्वत करू नये, असा टोला लगावला. यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या संदर्भात कुणीही वक्‍तव्ये करू नयेत, असे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांची भेट व्हायची, असे वक्‍तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर राऊत यांनी माघार घेत त्यांचे हे वक्तव्य माघारीही घेतले आहे.  कुख्यात गुंड करीम लाला याला भेटण्यासाठी इतर नेते जसे जात होते, तसे इंदिरा गांधीही भेटत होत्या, असे संजय राऊत मुलाखतीत म्हणाले होते. त्यावरही संजय राऊत यांनी दुसऱ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत पुन्हा स्पष्टीकरणही दिले. देशातील अनेक नेते करीम लाला याला भेटत होते. करीम लाला पठाण संघटनेचा अध्यक्ष होता. या संघटनेला अनेक नेते भेट देत होते. इंदिरा गांधींबद्दल माझ्याएवढा आदर कुणी दाखवला नाही. इंदिरा गांधींवर टीका झाली त्या वेळी कॉंग्रेसवालेही शांत होते, असे संजय राऊत म्हणाले होते. मात्र, दुपारनंतर संजय राऊत यांनी वक्तव्य मागे घेतले.

भाजपचा मास्टरस्ट्रोक; केजरीवालांच्या विरोधात यांना उमेदवारी?

कॉंग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करीत होते का? ः फडणवीस
संजय राऊतांच्या आरोपांवर सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी गप्प का आहेत? कॉंग्रेसने राऊत यांच्या आरोपांना उत्तर न दिल्यास त्यांच्या वक्तव्यात तथ्य आहे, असे मानले जाईल, असा आरोप करीत कॉंग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करीत होते का, असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. कॉंग्रेसने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असेही आवाहन फडणवीस यांनी केले.

फडणवीस यांनी राईचा पर्वत करू नये ः बाळासाहेब थोरात
देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करू नये, असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. थोरात म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे. पण, भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत. महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर कॉंग्रेस खपवून घेणार नाही, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी संजय राऊत यांनी चुकीची विधाने केली आहेत. एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल चुकीची विधाने करणे अयोग्य आहे. कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल; पण त्यांच्याबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही. - अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

लाथ मारायची; मग सॉरी म्हणायचे, ही इंग्रजांनी आणलेली पद्धत आहे. आता संजय राऊत सॉरी म्हणत असतील आणि ते कॉंग्रेसला मान्य असेल, तर आम्हाला काही अडचण नाही. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

दिवंगत इंदिरा गांधी यांच्या संदर्भात कुणीही वक्‍तव्ये करू नयेत; शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले असून मला जास्त बोलायची आवश्यकता वाटत नाही. - पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे