सोलापूरमध्ये लोडशेडिंग! सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत गावांमधील वीजपुरवठा बंद; शेतकरी सिंगल फेजवर कृषिपंप जोडत असल्याने निर्णय, वाचा...

वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांना पिकांना दररोज पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतकरी शेती फिडरवरील सिंगल फेजवर कृषिपंप जोडत आहेत. त्यामुळे ‘महावितरण’कडून अशा शेती फिडरवरील वीजपुरवठा सायंकाळी ६ ते रात्री ८ किंवा १० वाजेपर्यंत बंद ठेवला जात आहे.
Mahavitaran
Mahavitaran

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांना पिकांना दररोज पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतकरी शेती फिडरवरील सिंगल फेजवर कृषिपंप जोडत आहेत. त्यामुळे ‘महावितरण’कडून अशा शेती फिडरवरील वीजपुरवठा सायंकाळी ६ ते रात्री ८ किंवा १० वाजेपर्यंत बंद ठेवला जात आहे.

सोलापूर शहरात सव्वादोन लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. त्यांना दरमहा सरासरी ४८ मिलियन युनिट वीज लागते. मात्र, आता हा वापर ५६ मिलियन युनिटपर्यंत (५६० लाख युनिट) पोहोचला आहे. शहरात आठवड्यातून दोनदा नळाला पिण्यासाठी पाणी येते, त्यावेळी बहुतेक ठिकाणी नळाला इलेक्ट्रिक मोटार लावली जाते. दुसरीकडे, सोलापूर ग्रामीणमध्ये सव्वानऊ लाख वीजग्राहक असून, त्यापैकी साडेसहा लाखांपर्यंत घरगुती ग्राहक आहेत. ग्रामीण भागात दररोज सरासरी १२६० मेगावॉट विजेचा वापर होत आहे, जो उन्हाळ्यापूर्वी १२०० मेगावॉटपर्यंत होता.

दरम्यान, तापमानाचा पारा ४२ अंशांवर पोहोचल्याने शेतीपंपासाठी मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जात आहे. त्यामुळे शेतकरी सिंगल फेजवर कृषीपंप जोडत असल्याने त्या फिडरवरील अपेक्षित लोड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लोडशेडिंग नसले तरी त्या फीडरवरील वीजपुरवठा सायंकाळी सहा ते रात्री आठ-दहा वाजेपर्यंत बंद ठेवला जात असल्याची माहिती ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत

उन्हामुळे ग्रामीण भागात विजेचा वापर वाढल्याने सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. गावांपासून दूर अंतरावरील विहिरींमधून पाणी गावाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभात सोडले जाते. त्यानंतर ते पाणी आठवड्यातील ठरलेल्या दिवशी गावकऱ्यांना दिले जाते. मात्र, वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने अनेक गावांना आठवड्यातून एक-दोन वेळाच पाणी मिळत आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत वीजबिलात सूट

ज्या वीजग्राहकांनी ‘टीओडी’ स्मार्ट मीटर बसविले आहेत, त्यांना ‘महावितरण’कडून प्रतियुनिट वीजबिलात सवलत दिली जाते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ८० पैसे सूट दिली जात आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविले आहेत. सध्या तीव्र उन्हात या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर सवलत मिळत आहे.

ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी

सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये लोडशेडिंग नाही. शेतीच्या फिडरवरील सिंगल फेज काही वेळेसाठी बंद ठेवली जात आहे. तरीही ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी ‘महावितरण’कडून घेतली जात आहे.

- मनोजकुमार सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता (महावितरण), सोलापूर

सोलापूर जिल्ह्याची स्थिती

  • डिसेंबरमधील वीज वापर : ६८२ मिलियन युनिट

  • मार्च-एप्रिलमधील वीज वापर : ८८० मिलियन युनिट

  • -----------

  • सोलापूर शहराची स्थिती

  • डिसेंबरमधील वीज वापर : ४८ मिलियन युनिट

  • मार्च-एप्रिलमधील वीज वापर : ५६ मिलियन युनिट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com