Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Loksabha 2024
Loksabha 2024 sakal

विजय चोरमारे

Mumbai News: मतदानाची टक्केवारी उसळी घेते तेव्हा ती प्रस्थापितांविरोधातील लाट असते आणि टक्केवारी घसरते तेव्हा त्याचा फटका सत्ताधा-यांना बसतो, हे आजवरच्या लोकसभा निवडणुकीतील टक्केवारीवरून दिसून आले आहे.

गेल्या बारा निवडणुकांपैकी पाचवेळा मतांची टक्केवारी घटली त्यापैकी चार वेळा केंद्रातील सरकार बदलले आहे. त्यामुळे अठराव्या लोकसभेसाठी दोन टप्प्यांमधील विशेषतः दुस-या टप्प्यातील घसरलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.(maharashtra loksabha election)

महाराष्ट्रात दुस-या टप्प्यात झालेल्या आठ लोकसभा मतदारसंघांत मिळून २०१९ मध्ये ६२.८ टक्के मतदान झाले होते, ते यावेळी ५९.६ टक्क्यांवर घसरले आहे. अमरावती आणि वर्धा या दोन मतदारसंघांतील मतांची टक्केवारी २०१९च्या निवडणुकीतील टक्केवारीच्या जवळपासची आहे. अन्य सहा मतदारसंघांमध्ये टक्केवारीतील तुलनात्मक फरक अनेकांची चिंता वाढवणारा ठरला आहे. बुलढाण्यात ६३.६ वरून ५८.४५, अकोल्यात ६०.६ वरून ५८.०९ वर, यवतमाळमध्ये ६२.५६ वरून ५७ वर, हिंगोलीत ६६.८४ वरून ६०.७९ वर, नांदेडमध्ये ६५.६९ वरून ५९.५७ वर आणि परभणीत ६३.१२ वरून ६०.०९वर टक्केवारी घसरली आहे. (voteing percent in maharashtra loskabha )

टक्केवारी घसरण्यामागे तीव्र उन्हाळा हे कारण असल्याचे सांगितले जाते, त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी तेच एकमेव कारण नाही. राजकीय अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मतदारांची उदासीनता हे खरे कारण आहे. काही जाणकारांच्या मते, सरकार चांगले काम करीत असल्यास आणि पर्यायाने लोकांना बदल नको असल्यास लोक मतदानासाठी बाहेर पडत नाहीत. पुढील टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.(maharashtra political news)

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळी ३.८ टक्के कमी मतदान झाले. त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपच्या प्रभावक्षेत्रात पाच टक्के मतदान कमी झाले आहे, तर इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रभावक्षेत्रातील मतदानातील घट अडीच टक्के आहे. दुस-या टप्प्यात ज्या १३ राज्यांतील ८८ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यापैकी ६४ जागा भाजपकडे आणि २४ जागा इंडिया आघाडीतील पक्षांकडे होत्या.

या टप्प्यात केरळमधील संपूर्ण वीस जागांवर मतदान झाले. कर्नाटकातील १४, राजस्थानातील १२, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी ८, मध्य प्रदेशातील ६, बिहारमधील पाच तसेच छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन अशा जागांचा या टप्प्यात समावेश होता. देशपातळीवरील चित्र पाहिले तर दुस-या टप्प्यातील ज्या २४ जागा इंडिया आघाडीकडे होत्या, त्यातील वीस जागा केरळमधील असल्यामुळे तिथे भाजपला काही संधी नाही. उलट महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, कर्नाटकमधील अनेक जागांवर इंडिया आघाडीतील पक्षांना संधी असल्याचे चित्र दिसते.(Maharashtra, Rajasthan, Bihar, Karnataka)

महाराष्ट्रातील आठपैकी तीन मतदारसंघांमध्ये विजयी उमेदवारांच्या मतांमधील फरक चाळीस हजारांच्या आसपास होता. परभणीत शिवसेनेच्या संजय जाधव यांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा ४२ हजारांनी पराभव केला होता, तर अमरावतीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरील अपक्ष नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव आडसूळ यांना ३७ हजारांनी हरवले होते. तर नांदेडमध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांकडून चाळीस हजारांनी पराभूत झाले होते.

दुस-या टप्प्यातील महाराष्ट्रातील आठपैकी सात जागांवर भाजप-शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते, तर एक जागा राष्ट्रवादी पुरस्कृत नवनीत राणा यांनी जिंकली होती, ज्या आता भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. म्हणजे

लोकसभा निवडणुकीतील टक्केवारी

१९७७ – ६०.४९ – जनता पक्ष

१९८० – ५६.९२ – पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत

१९८४ – ६४.०१ – काँग्रेस (इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरची निवडणूक)

१९८९- ६१.७५ – जनता दल

१९९१ – ५६.७३ – काँग्रेस

१९९६- ५७.९४ – भाजप

१९९८ – ६१.९७ – भाजप

१९९९ – ५९.९९ - भाजप

२००४ – ५८.०७ - काँग्रेस

२००९ – ५८.२१ - काँग्रेस

२०१४ – ६६.४४ - भाजप

२०१९ – ६७.४० - भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com