महानायक अमिताभच्या 'कौन बनेगा करोडपती'त 'भोंदूगिरी'; 'अंनिस'कडून भांडाफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

विज्ञानाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या भोंदुगिरीला पालकांनी बळी पडू नये.

महानायक अमिताभच्या 'कौन बनेगा करोडपती'त 'भोंदूगिरी'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : 16 नोव्हेंबर रोजी रात्री आणि 17 नोव्हेंबरला सकाळी झालेल्या 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) ह्या प्रसिद्ध टेलिव्हिजन शो'मध्ये डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा कथित चमत्कार प्रयोग दाखवण्यात आला. महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या समोर हा कथित चमत्कार दाखवल्यामुळे आणि त्यांनी ह्या गोष्टीचं कौतुक केल्यामुळं एक अत्यंत चुकीच्या आणि भोंदूगिरीच्या गोष्टीचा प्रचार समाजात केला गेला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं (Andhashraddha Nirmulan Samiti) ह्या घटनेला जोरदार आक्षेप घेतला असून अंनिसमार्फत कथित चमत्काराच्या मागची हातचलाखी दाखवणारा व्हिडियो रिलीज करण्यात आलाय.

यासंदर्भात हमीद दाभोलकर यांच्याशी साधलेला संवाद; पाहा व्हिडीओ...

या व्हिडिओमध्ये डोळ्यावर पट्टी बांधून वाचन करणारे अंनिसचे कार्यकर्ते दाखवण्यात आले आहेत. विज्ञानाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या ह्या भोंदुगिरीला पालकांनी बळी पडू नये, तसेच कोन बनेगा करोडपती या शो'नं घडलेल्या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करून प्रत्यक्षात या कथित चमत्काराच्या मागचं विज्ञान आपल्या पुढच्या शो'मधून लोकांच्या समोर दाखवावं, असं आवाहन महाराष्ट्र अंनिसमार्फत हमीद दाभोलकर (Hamid Dabholkar) आणि प्रशांत पोतदार (Prashant Potadar) यांनी केलंय. महानायक अमिताभ बच्चन यांनी आपली चूक दुरुस्त करावी आणि अशा अवैद्यानिक गोष्टींना आपल्या शो'मध्ये थारा देवू नये, असे देखील आवाहन त्यांनी केलंय. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटलंय, की डोळ्यावर पट्टी बांधून गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात तसेच अनेक राज्यांमध्ये मुलांचे मिड ब्रेन अक्टिव्हेशन करून त्यांचा बुध्यांक, तसेच स्मरणशक्ती वाढवतो, असे दावे करणाऱ्या मार्गदर्शन वर्गांचे पेव फुटले आहे.

हेही वाचा: निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाला धक्का; चार आमदार भाजपात दाखल

मिड ब्रेनचे (मध्य मेंदू) उद्दीपन केल्यामुळं डोळ्यावर पट्टी बांधून देखील मुलांना केवळ स्पर्शानं अथवा वासानं गोष्टी ओळखता येतात, असा दावा मिड ब्रेन अक्टिव्हेशनच्या जाहिरातींमधून केला जातो. विज्ञानाच्या नावावर हातचलाखीचा वापर करून मुलांची व पालकांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास होतो, या भूल थापेला बळी पडून अनेक पालक हजारो रुपये यामध्ये खर्च करत आहेत. हे सर्व थांबवणे आवश्यक आहे. डोळ्यावर पट्टी बांधली असताना नाक आणि डोळे यांच्यामध्ये जी जागा राहते, त्यामधून बघून गोष्टी ओळखल्या जातात. जर हातानं दाब देवून डोळे घट्ट बंद केले अथवा डोळ्यावर आतून काळा रंग दिलेला आणि घट्ट बसणारा पोहण्याचा चष्मा लावला, तर या गोष्टी ओळखता येत नाहीत, हे अंनिसनं अनेक वेळा सिद्ध केलंय. आजूबाजूला पूर्ण अंधार करून अथवा डोक्याच्या मागच्या बाजूला वस्तू धरली असता, मिड ब्रेन अक्टिव्हेशनचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना वस्तू ओळखता येत नाहीत. तसेच अंध मुलांना देखील मिड ब्रेन अक्टिव्हेशनचे कितीही प्रशिक्षण दिले, तरी अशा प्रकारे वस्तू ओळखता येत नाही, हे देखील पत्रकात नमूद केलंय.

हेही वाचा: मानेंचा पत्ता कट करून महाडिकांना उतरवलं मैदानात

वैद्यकीयदृष्ट्या मिडब्रेन, वास घेणे अथवा स्पर्श या गोष्टींचा आणि दिसण्याची क्रिया यांचा संबंध नसल्याने जैविक पातळीवर मिड ब्रेन अक्टिव्हेशनमुळं वास घेवून अथवा स्पर्शानं डोळे बंद असताना दिसू शकते, हा दावाच वैद्यकीयदृष्ट्या अशक्य असल्याची माहिती देखील पत्रकात देण्यात आलीय. केवळ संगीताचा वापर करून प्रशिक्षणाचा वर्ग घेण्यास हरकत असण्याचे कारण नसून मिड ब्रेन अक्टिव्हेशनच्या नावाखाली चमत्काराचा दावा करून पालकांची आणि मुलांची फसवणूक करण्यास अंनिसचा विरोध आहे. ही एक आधुनिक प्रकारची बुवाबाजीचा आहे, असं देखील ते म्हणाले. काही वाहिन्यांवरून मिड ब्रेन अक्टिव्हेशनचे जे कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येत आहेत, त्याविषयी अंनिसतर्फे प्रसार भारतीकडे तक्रार दाखल करण्यात आलीय, असं देखील त्यांनी सांगितलं. जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत या विषयी तक्रार दाखल करता येवू शकते का याचा देखील कायदेशीर सल्ला अंनिस घेत असल्याचे वंदना माने यांनी सांगितले. यावेळी हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, प्रशांत जाधव, शंकर कणसे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: 'जय भीमवरचं प्रेम जबरदस्त आहे, मी याआधी कधीच असं पाहिलं नाही'

loading image
go to top