'मी सांगतो तेवढचं ऐकायचं!'; नाना पटोलेंचं सभागृहात पहिलं वक्तव्य 

टीम ई-सकाळ
रविवार, 1 डिसेंबर 2019

भाजपचे किसन कथोरे यांनी माघार घेतल्यामुळं नाना पटोले यांची बिनविरोध निवड होत असल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली

मुंबई : विधानसभेत आज, महाविकास आघाडीचे नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. काल सभागृहात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर सभागृहात थोडं तणावाचं वातावरण होतं. पण, आज सभागृहाचं वातावरण एकदम निवळल्याचं आणि हलकं-फुलकं झाल्याचं पहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून खेळीमेळीच्या वातावरणात एकेमेकांना चिमटे काढण्यात आले. 

डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय म्हणाले नाना!
भाजपचे किसन कथोरे यांनी माघार घेतल्यामुळं नाना पटोले यांची बिनविरोध निवड होत असल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान केलं. त्यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं हस्तांदोलन करून, त्यांचं अभिनंदन केलं. विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर विरोधी गटातून काही तरी विचारणा करण्यात येत होती. कोपरखळ्या मारणं सुरू होतं. त्यावेळी खुर्चीवर बसलेल्या नाना पटोले यांनी 'मी सांगतो तेवढचं ऐकायचं!', असं वक्तव्य केलं. त्यावरून सभागृहात हशा पिकला. 

डाव्या कानानी जास्त ऐका
देवेंद फडणवीस यांनी नाना पटोले यांच्याकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या. ते म्हणाले, 'विरोधकांना विधानसभा अध्यक्षांचा आधार असतो. त्यामुळं तुम्ही आता डाव्या बाजूनं जास्त ऐकावं, डावीकडं जास्त पहावं. उजव्या बाजूला कमी पहावं, अशी अपेक्षा आहे.'

आणखी वाचा - वाचा नाना पटोले यांचा प्रवास

एकनाथ शिंदे काय म्हणाले?
फडणवीस यांनी नाना पटोले यांच्याकडं डाव्या बाजूचं जास्त ऐकावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांचं कौतुक करताना, 'असं काही करून नका, कान दोन्ही बाजूनं उघडे ठेवा.' असा सल्लादिला. 

आणखी वाचा - रश्मी ठाकरेंचा शालीन वावर तर, सुप्रीया सुळे राज्यात फ्रंटफूटवर
आता राजीनामा देता येणार नाही
जयंत पाटील यांनी नाना पटोले याचं कौतुक केलं. ते म्हणाले, 'अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची नाना तुमची ओळख आहे. शेतकऱ्यांविषयी तुमची मतं स्पष्ट आहेत. त्यामुळंच तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लोकसभा सदस्यात्वाचा राजीनामा दिला होता. आता तुम्हाला तसे करता येणार नाही. तुम्हाला आदेश देण्याचे अधिकार आहेत. त्या खुर्चीवर बसून तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकता. त्या खुर्चीवर बसल्यानंतर डाव्या बाजूचं कमी ऐकायला येतं, असा अनुभव आहे. पण, तुम्ही सर्वांना न्याय द्याल अशी अपेक्षा आहे.'

आणखी वाचा - भाजपला हरवण्याचं उद्धव ठाकरे यांचं सत्तानाट्य 

कृषी मंत्री व्हाल अशी अपेक्षा होती 
फडणवीस म्हणाले, 'कृषी मंत्री व्हाल, अशी आमची अपेक्षा होती. पण, तुम्ही विधानसभा अध्यक्ष झालात. तुमचे अभिनंदन.' त्यावेळी सभागृहातून सदस्यांनी हे सगळं बाळासाहेब थोरातांनी केलंय, असा टोला लगावला. त्यामुळं नाना पटोले यांच्यासह सभागृहातील सगळेच हसले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra assembly speaker nana patole first statement in vidhan sabha