esakal | रश्मी ठाकरेंचा शालीन वावर तर, सुप्रीया सुळे राज्यात फ्रंटफूटवर

बोलून बातमी शोधा

रश्मी ठाकरेंचा शालीन वावर तर, सुप्रीया सुळे राज्यात फ्रंटफूटवर

राज्यातील सत्तानाट्यात अनेक राजकीय नेत्यांनी थेट सहभाग घेतला. या रणधुमाळीत पडद्यामागे अनेक घटना घडत होत्या. राजकीय कुरघोडीच्या या समरप्रसंगात दोन महिला परिस्थितीला भक्कमपणे सामोऱ्या जाताना दिसल्या.

रश्मी ठाकरेंचा शालीन वावर तर, सुप्रीया सुळे राज्यात फ्रंटफूटवर
sakal_logo
By
धनंजय बिजले

मातोश्री ते वर्षा...
यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे घराण्यातील व्यक्ती प्रत्यक्ष संसदीय राजकारणात उतरण्याची ही पहिलीच वेळ! आता तर स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले असून, पुत्र आदित्य आमदार झाले आहेत. ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेतून बाहेर पडत ठाकरे आता थेट सत्तेच्या आखाड्यात उतरले आहेत. निवडणूक न लढविण्याची घराण्याची परंपरा मोडून नवा इतिहास रचण्यामागे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी यांनी महत्त्वाची भूमिका अदा केल्याचे मानले जाते.

भाजपला हरवण्याचं उद्धव ठाकरेचं महासत्तानाट्य

शिवसेनेच्या संघर्षमय इतिहासात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी मीनाताईंचा मोलाचा वाटा होता. शिवसैनिकांची त्या पोटच्या मुलाप्रमाणेच काळजी घेत. त्यामुळे सारे त्यांना आपुलकीने माँसाहेब म्हणत. या वेळच्या सत्तानाट्यात रश्‍मी ठाकरे यांचा जो शालीन वावर होता, त्यामुळे शिवसैनिकांना नक्कीच माँसाहेबांची आठवण झाली असेल. शिवसेनेचा हळदी-कुंकू समारंभ असो अथवा अन्य कार्यक्रम; त्यात रश्‍मी ठाकरेंची उपस्थिती शिवसैनिकांचा हुरूप वाढवत असे. आदित्यने जेव्हा वरळीतून उमेदवारीची घोषणा केली त्या वेळी आई म्हणून रश्‍मी स्वतः उपस्थित होत्या. मुलाचे कौतुक करणारी, भक्कम आधार देणारी आई, अशी भूमिका त्यांनी बजाविली. तसेच, उद्धवजींना पत्नी म्हणूनही या सत्तापेचात भक्कम साथ दिली. अगदी राज्यपालांना ज्या वेळी उद्धव ठाकरे भेटायला गेले त्या वेळीदेखील त्या त्यांच्यासमवेत होत्या. शिवसेनेचाच मुख्यमंत्री, या भूमिकेवर ठाकरे ज्या प्रकारे ठाम राहिले त्यात रश्‍मीवहिनींचा महत्त्वाचा वाटा आहे, असे त्यांना ओळखणाऱ्या जुन्या-जाणत्या शिवसैनिकांचे ठाम मत आहे. मूळच्या डोंबिवलीच्या असलेल्या हसतमुख रश्‍मी पाटणकर यांचा १३ डिसेंबर १९८९ रोजी उद्धव यांच्याशी विवाह झाला अन्‌ त्या ठाकरे झाल्या. येत्या १३ तारखेला लग्नाचा तिसावा वाढदिवस त्या ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी साजरा करणार की ‘मातोश्री’वर, हे पाहणे रंजक असणार आहे.

भाजपची माघार; नाना पटोले विधानसभेचे बिनविरोध अध्यक्ष!

राज्यात प्रथमच फ्रंटफूटवर
खासदार सुप्रिया सुळे यांना राजकारणात येऊन आता बरीच वर्षे झाली. खासदार म्हणून त्या दिल्लीत व आपल्या बारामती मतदारसंघात रमल्या. राज्याच्या राजकारणात त्यांनी कधी लक्ष घातले नाही. या वेळचे सत्तानाट्य मात्र याला अपवाद ठरले. शिवसेनेशी आघाडी असो किंवा अजित पवार यांचे कथित बंड, सुप्रिया सुळे त्यावर थेटपणे बोलत्या झाल्या. त्यांनी केवळ पडद्यामागेच महत्त्वाची भूमिका अदा केली नाही, तर अनेक राजकीय घडामोडींत त्या फ्रंटफूटवर दिसल्या.

या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत त्या बहुतांश बैठकांना सावलीप्रमाणे उपस्थित राहिल्या. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच, ‘घरात व पक्षात फूट पडल्या’चे सोशल मीडियाद्वारे सर्वप्रथम जाहीर केले ते सुप्रियाताईंनीच! पुढे हे कथित बंड संपुष्टात आणण्यातही त्यांनी मोलाचा वाटा उचलला. ‘आगे आगे देखो, होता है क्‍या’ असे म्हणत त्यांनी सोशल मीडियातून यावर भाष्य केले. याच काळात रोहित पवार व आदित्य ठाकरे यांच्यासमवेतचे त्यांचे एकत्रित छायाचित्रही चर्चेचा विषय ठरले.

भाजपच्या सापळ्यातून सुटका; शिवसेैनिकांना बळ

नव्या विधानसभा सदस्यांच्या शपथविधी प्रसंगी सर्वाधिक चर्चा झाली ती सुप्रिया सुळेंचीच. त्यांनी अगदी सकाळी विधानसभेच्या प्रवेशद्वारात सर्वांचे मोठ्या आपुलकीने स्वागत केले. त्यातही अजित पवार यांच्यासमवेतच्या त्यांच्या भेटीची खास चर्चा झाली. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळीही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज ठाकरे, स्टॅलिन यांच्याप्रमाणेच देशपातळीवरील अनेक नेत्यांचे त्या आपुलकीने स्वागत करीत होत्या. शपथविधीवेळी जणू यजमानाचीच भूमिका त्यांनी पार पाडली. एकूणच, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या सत्तानाट्यात सुप्रिया सुळे यांनी पडद्यामागे बरीच महत्त्वाची भूमिका बजावल्याचे वरील घटनाक्रमांतून स्पष्ट होते.

धनंजय बिजले,  dhananjay.bijale@esakal.com