महाराष्ट्रात 10 लाखांवर कोरोना रुग्ण; पुण्याची आकडेवारी चिंता वाढवणारी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 10 लाखांच्या वर पोहोचली असून शुक्रवारी एका दिवसात राज्यात 24 हजार 886 नव्या रुग्णांची नोंद झाली. 

पुणे - महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 10 लाखांच्या वर पोहोचली असून शुक्रवारी एका दिवसात राज्यात 24 हजार 886 नव्या रुग्णांची नोंद झाली. भारतात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असून पुण्यात सक्रीय रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 10 लाख 15 हजार 681 इतकी झाली आहे. यातील 7 लाख 15 हजार 23 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत राज्यात 28 हजार 724 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 2 लाख 71 हजार 566  कोरोनाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.

महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रीय रुग्ण पुण्यात आहेत. दिवसेंदिवस पुण्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सध्या पुण्यामध्ये 72 हजार 835 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ठाणे जिल्ह्यात 28 हजार 688 रुग्णांवर तर मुंबईत 27 हजार 642 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय नागपूरमध्ये 20 हजारांपेक्षा जास्त तर नाशिकमध्ये 10 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

आरोग्य विभागाची अधिकृत आणि सविस्तर आकडेवारी वाचण्यासाठी क्लिक करा

भारातील कोरोना रुग्णांची संख्या 45 लाख 62 हजारांपेक्षा जास्त आहे. तर आतापर्यंत देशात 35 लाख 42 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात एका दिवसात सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात 96 हजार 551 रुग्ण सापडले. दिवसाला एक लाख रुग्णांचा आकडा लवकरच गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतकंच नव्हे तर गेल्या 24 तासात देशात 1209 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  भारतात सध्या 9 लाख 43 हजार 480 कोरोना बाधितांवर उपचार सुरु असून आतापर्यंत एकूण 76 हजार 271 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra covid 19 positive cross 10 k pune mumbai thane max active cases