नांदेड जिल्ह्यात सलग सहा दिवस मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. किनवट तालुक्यातील पिंपरी, भंडारवाडी, परोटी, रिठा, कोपरा आणि यंदापेंदा या गावांमध्ये शेतजमीन अक्षरशः पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने शेती खरडून गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाले असून, त्यांनी शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.