पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी कार्यान्वित करण्याची कार्यवाही गुरूवारी (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५) पूर्ण झाली आहे. ४४ अभियंते आणि २०० कामगार, कर्मचा-यांनी ३० तास अविरत कार्यरत राहत जलवाहिनी कार्यान्वित करण्याबरोबरच दुरूस्तीकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योग्य दाबाने, गळतीविरहीत होण्यास मदत मिळणार आहे. जलवाहिनी भारित (चार्जिंग) झाल्यानंतर एस, एल, के पूर्व , एच पूर्व, आणि जी उत्तर विभागांतील परिसरांचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.