राज्यात पहिल्यांदाच साजरा होणार पक्षी सप्ताह; विविध प्रकारच्या पक्ष्यांची होणार गणना  

चेतन देशमुख
Thursday, 5 November 2020

मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनपासून (पाच नोव्हेंबर) ते पक्षीमित्र डॉ. सलीम अली यांच्या जयंतीपर्यंत (12 नोव्हेंबर) या कालावधीत पक्षी गणना केली जाणार आहे.

यवतमाळ : जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्यादृष्टीने पक्षी अत्यंत महत्वाचे आहेत. पक्षांची जैवविविधता झपाट्याने कमी होत आहे. अनेक पक्षी प्रजाती दूर्मीळ श्रेणीत समाविष्ट होत आहे. पक्षांचे महत्व लक्षात घेता पहिल्यांदाच राज्यात पक्षीसप्ताह साजरा केला जात आहे.

मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनपासून (पाच नोव्हेंबर) ते पक्षीमित्र डॉ. सलीम अली यांच्या जयंतीपर्यंत (12 नोव्हेंबर) या कालावधीत पक्षी गणना केली जाणार आहे. जिल्ह्यात येणारे पक्षी, त्यांची नावे, ठिकाण, कालावधी यांची सर्व माहिती पहिल्यांदाच संकलित केली जाणार आहे.

क्लिक करा - ट्रेनमध्ये भुकेने व्याकुळ झाले होते चार महिन्याचे बाळ; जवळचे दूधही होते खराब; अखेर आरपीएफने दाखवली तत्परता 

पक्षी हा सृष्टीतील महत्वाचा घटक आहे. बदलत्या पर्यावरणाचे इंडिकेटर म्हणूनही पक्षाला संबोधले जाते. झपाट्याने कमी होत असलेल्या पक्षांची संख्या पाहता अनेक पक्षी दूर्मीळ झाले आहे. या दूर्मीळ पक्षासोबत इतर राज्य व देशविदेशांतून येणाऱ्या पक्षांची माहिती नागरिकांना व्हावी, त्यांना पक्षांचे महत्व कळावे, यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. 

नोव्हेंबरमध्ये अनेक पक्षी स्थंलातर करतात. हा काळ स्थलातंराच्यादृृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे या काळात अनेक पक्षांच्या प्रजातीची माहिती संकलित होऊ शकते. वन्यजीवविषयक साहित्यनिर्मितीत अग्रणी असणारे निवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन ते द बुक ऑफ इंडियन बर्डसच्या आधारावर अनेक पक्षीमित्र घडविणारे पक्षीमित्र डॉ. सलीम अली यांच्या जयंतीदिनपर्यंत राज्यभरात पक्षी सप्ताह साजरा केला जाणार आहे. 

त्यातून पक्ष्यांचे निसर्गातील महत्व, संकटग्रस्त पक्षी त्यांचे अधिवास, स्थलांतर, येणारे पक्षी, ठिकाण आदी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे सप्ताह राबविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील तलाव व पक्षी असणारे स्थळ निश्‍चित करण्यात आले असून, सर्व माहिती, फोटो संकलित केले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना पक्ष्यासंदर्भातील इत्थंभूत माहिती उपलब्ध होणार आहे.

नक्की वाचा - बापाच्या डोळ्यासमोरच चिमुकली खेळत होती, पण भरधाव वाहन आलं अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं

जिल्ह्यात पाच ते 12 नोव्हेंबरदरम्यान पक्षी सप्ताह साजरा केला जाणार आहे. जामवाडी, बेंबळा, निळोणा, बोरगाव डॅम आदी ठिकाणी पक्षी आढळतात. त्यादृष्टीने आम्ही माहिती संकलित करणार आहोत. जिल्ह्यात येणार व जाणारे अशा सर्व पक्षांची माहिती संकलित केली जाणार आहे. पक्षीमित्रांकडे फोटोग्राफ असतील, तर त्यांनी ते उपलब्ध करून द्यावे.
-केशव वाळवे,
 उपवनसंरक्षक, यवतमाळ. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra will celebrate a week dedicated to birds