esakal | महाराष्ट्र बंदसाठी नवी मुंबईत महाविकास आघाडीची जय्यत तयारी | mva government
sakal

बोलून बातमी शोधा

 Mantralaya

महाराष्ट्र बंदसाठी नवी मुंबईत महाविकास आघाडीची जय्यत तयारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सानपाडा : लखीमपूर (Lakhimpur incident) येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्याच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी व त्याविरोधात वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या घरी आयकर विभागाला (Income Tax department) धाडी मारण्याचे आदेश देणाऱ्या केंद्र सरकारचा (central Government) निषेधासाठी महाविकास आघाडीच्या (mva government) वतीने ११ ऑक्टोबर रोजी पुकारण्यात येणाऱ्या एक दिवसीय बंदसाठी (maharashtra bandh) नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे.

केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद लोकशाही मार्गाने व्हावा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच लॉकडाऊनमध्ये आधीच पिचलेल्या सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने नवी मुंबईत जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

हेही वाचा: आईवर रुसलेल्या लेकीची निर्भया पथकाने केली सुरक्षित घरवापसी

शनिवारी नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, वाशी ब्लॉक अध्यक्ष सचिन नाईक यांनी माथाडी भवन येथे आपापल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत जमून अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर गटागटाने त्यांनी एपीएमसी मार्केटच्या व्यापाऱ्यांना ११ ऑक्टोबरच्या बंदमध्ये सामील होण्यासाठी आवाहन केले.

रविवारी सकाळी शिवेसना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, महिला संघटक रंजना शिंत्रे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी, रवींद्र सावंत, अन्वर हवालदार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, संतोष घोसाळकर, शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी, ज्ञानेश्वर सुतार आदीची एक बैठक झाली. बैठकीत सर्व व्यापारी आणि त्यांच्या विविध संघटना व वाहतूक संघटनांना बंदमध्ये सामील होण्यासाठी आवाहन करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: गरबा बंदीमुळे कलाकारांवर संक्रांत; कोरोनामुळे हतबल, दिवाळी कशी करणार?

"केंद्रीय गृहमंत्र्याने जनतेचे रक्षण करणे अपेक्षित आहे. मात्र त्यांच्या मुलानेच आपल्या वाहनाखाली शेतकऱ्यांना चिरडण्याचे पातक केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी बंदची हक देण्यात आली असून, हा बंद लोकशाही मार्गाने होणार आहे."
- विठ्ठल मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख

"बंद यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. सोमवारी सकाळी नवी मुंबईत विविध ठिकाणी पायी लाँगमार्च काढून पुन्हा एकदा दुकानदार आणि व्यापारी यांना बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन करून बंद १०० टक्के यशस्वी करणार."
- अनिल कौशिक, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष

"बंद शांततापूर्ण मार्गाने करण्यासाठी नागरिक आणि व्यापारी यांना आवाहन करण्यात आले आहे. आणि ते देखील स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होणार आहेत. कुणाचेही नुकसान होणार नाही. कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याबाबत काळजी घेतली जाणार आहे."
- अशोक गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई

loading image
go to top