विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते म्हणाले...

Mahavikas-Aghadi
Mahavikas-Aghadi

मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला. आणि याअगोदर जाहीर केल्याप्रमाणे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले. 

ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बाजूने 169 मते पडली. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एक, एमआयएमचे 2 आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक आमदार अशा एकून 4 आमदारांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर विधानसभा सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. काय म्हणाले हे नेते ते पाहूया- 

सुप्रिया सुळे म्हणाल्या...

विरोधी पक्षाच्या वागण्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण या स्तरावर गेलंय ही दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र, आमच्या सरकारमध्ये विरोधकांचा मान-सन्मान केला जाईल. आम्ही सूडाचं राजकारण करणार नाही. आमचा लढा वैचारिक आहे, वैयक्तिक नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही विरोधकांचा नेहमी मान ठेऊ. कारण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे.

अजित पवार म्हणाले...

170 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकणार असे वाटले होते. मात्र, पालघरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदाराने आघाडीच्या मदतीने निवडून येऊनही आम्हाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे आम्हाला 169 मते मिळाली. पहिली परीक्षा आम्ही पास झालो आहे. उद्या होणारी दुसरी परीक्षा विधानसभा अध्यक्षाची निवडणूकही आम्हीच जिंकू, याचा विश्वास आहे. सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले होते. त्यानुसार विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज सुरू केले होते.

शिवसेना आणि भाजप यांनी एखादी निवडणूक सोडता जवळपास सर्वच निवडणुका एकत्र लढवल्या. मात्र, आता शिवसेना सत्तेत आहे, तर भाजप विरोधात बसले आहे. अशा घटना राजकीय क्षेत्रात घडत असतात. त्या खिलाडूवृत्तीनं, दिलदारवृत्तीनं सर्वांनी स्वीकारल्या पाहिजेत. कारण यशवंतराव चव्हाणांपासून ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले... 

तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन स्थिर सरकार स्थापन केले. हा विजय महाराष्ट्राच्या जनतेचा असून स्थिर सरकार विकासाच्या दृष्टीने वाटचाल करेल. भाजपने 'ऑपरेशन लोटस' राबवून घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते यात अपयशी झाले.

प्रणिती शिंदे म्हणाल्या... 

आम्हाला विश्वास होता की, आम्ही विश्वासदर्शक ठराव नक्की पास करू. भाजपने आज 'बॅड लूजर्स' असल्याचे दाखवून दिले. महाविकास आघाडीचे हे सरकार पाच वर्षे नाहीतर तीस वर्षे टिकेल.

जयंत पाटील म्हणाले... 

देवेंद्र फडणवीसांचा हा रडीचा डाव आहे. आपला विजय होत नसल्याने फडणवीसांनी अधिवेशनाच्या सुरवातीपासूनच विनाकारण विरोध केला. आपल्याकडे असलेला पाठिंब्याचा आकडा आपण पूर्ण करू शकणार नाही, हे त्यांना माहित होते. मात्र, आपण उघडे पडू, असे वाटल्याने सुरवातीपासूनच त्यांनी रडीचा डाव खेळला. 

रोहित पवार म्हणाले...

विधानसभा सभागृहात महाविकास आघाडीचे सर्व आमदार शांत होते. आमचे आमदार जास्त असून जर आम्ही आवाज करण्याचा प्रयत्न केला, तर किती आवाज झाला असता? याचा अंदाज विरोधकांनी बांधायला हवा होता. मात्र, विधानसभा अध्यक्षांचा मान ठेऊन आम्ही शांत राहिलो. मात्र, विरोधी पक्ष हे विसरला. फक्त विरोध करायला म्हणून विरोध करायचा आणि सभागृहात गोंधळ घालायचा, हे विरोधी पक्षातील आमदारांना शोभत नाही.

महाविकास आघाडीचे सर्व आमदार भविष्यकाळात चांगला कारभार करतील, असा विश्वास आहे. तसेच मतदार संघातील अनेक प्रश्न वेळोवेळी मांडण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com