अशी आली आघाडीच्या नेत्यांची रणनीती फळाला! 

सिद्धेश्‍वर डुकरे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

अजित पवार यांच्या बंडानंतर गडबडून गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धीराने मार्ग काढून भाजपचा डाव भाजपवर उलटवला. शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या यशामागे या आघाडीच्या नेत्यांनी आखलेल्या रणनीतीचे यश असल्याचे सांगितले जाते.

मुंबई - अजित पवार यांच्या बंडानंतर गडबडून गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धीराने मार्ग काढून भाजपचा डाव भाजपवर उलटवला. शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या यशामागे या आघाडीच्या नेत्यांनी आखलेल्या रणनीतीचे यश असल्याचे सांगितले जाते. 

महाराष्ट्राच्या राजकारणातील हे चार दिवस आणि आठ घटना

महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाल्यावर अचानक अजित पवार यांनी राष्ट्रवादीला मागमूस न लागू देता बंड करीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह शपथविधी केला. पवार यांच्या बंडात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटला, असे चित्र निर्माण तर झालेच, त्याचबरोबर 36 आमदार फुटले, अशी चर्चा सुरू झाली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेचत डाचपेच आखले. फुटीर आमदारांना स्वगृही येण्यास भाग पाडले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर दिला. तसेच राज्यपालांच्या भूमिकेबद्दल कायदेशीर लढाई लढण्याचे मनसुबे जाहीर केले.

हो, अजितदादांच्या हातात कॅडबरी होती, कारण... : रोहित पवार

यानुसार कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी नेमक्‍या कोणत्या जबाबदाऱ्या स्वीकारायच्या आणि त्या पार पाडायच्या, असे ते ठरले. त्यानुसार कॉंग्रेस पक्षातील पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे दिल्लीतील "थिंक टॅंक' यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागून भाजपला उघडे पाडणे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी या तीन पक्षांच्या नेत्यांशी समन्व्य साधत राजकीय डावपेच तयार करण्याची भूमिका पार पाडली. तर शिवसेनेने तिन्ही पक्षांच्या सर्व आमदारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी उचलली. त्याचबरोबर या तीन पक्षांचे नेते फोनच्या माध्यमातून संपर्क करीत नव्हते. तर थेट भेट घेऊन पुढील रणनीती आखत होते. त्यामुळे डावपेच उघड होण्याचे काहीच कारण नव्हते. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक हे आमदारांवर लक्ष ठेवून होते.

तर कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी विधिमंडळ जाणकारांचे सल्ले घेऊन त्यानुसार कार्यवाही करणे; तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, आदित्य ठाकरे यांनी तीन पक्षांच्या आमदारांवर लक्ष ठेवण्याची कामगिरी निभावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavikasaghadi shivsena ncp congress leader politics