
"फॅसिझमविरोधात लढण्यास सक्षम पर्याय तयार होण गरजेचं"
मुंबई : देशात सुरु असलेल्या फॅसिझमविरोधात लढण्यास सक्षम असलेला पर्याय तयार होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. यानंतर बॅनर्जी आणि पवार यांनी संयुक्तरित्या माध्यमांना संबोधित केलं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते.
बॅनर्जी म्हणाल्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मी महाराष्ट्रात आले होते. पण ते आजारी असल्यानं त्यांची भेट होऊ शकली नाही. पण त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पक्षाचे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना भेटीसाठी पाठवलं. उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना केली. आज ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरु आहे, त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे पण हे कोणा एकट्याचं काम नाही. जो सक्षम आहे त्याला घेऊन हे करावं लागेल. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा, कोणी लढायला तयार नाही त्याला आम्ही काय करणार? अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.
शरद पवार युपीएमधील सर्वात वरिष्ठ नेते आहेत त्यामुळं तुम्हाला वाटतं का की शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करायला हवं? या पत्रकारांच्या प्रश्नावर ममता म्हणाल्या, "अरे तुम्ही युपीएची काय भाषा करता आता युपीए राहिलेली नाही. आता फक्त ते जाहीर करायचं राहिलंय"
शरद पवार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं आहे. आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. आपल्याला सन २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात भक्कम पर्याय देता यावा याबाबत आमची चर्चा झाली. नेता रस्त्यावर राहिला तरच त्या पक्षाचा विजय होतो, पण राहुल गांधी कायम परदेशात असतात, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. पत्रकारांनी याबाबत विचारलं असता. पवार म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये ममतांचा जो विजय झाला तो त्यांच्या मेहनतीनं झाला आहे. त्यामुळं त्यांचा वैयक्तिक अनुभावावरुन त्यांनी हे विधान केलं, ज्याचं आम्ही स्वागत करतो"