राहिले दूरच आजोळ..! | Lata Mangeshkar

Lata Mangeshkar
Lata MangeshkarSakal
Updated on

''आयुष्य उतरणीला लागले, की जुन्या स्मृती जिवंत होऊ लागतात. दूर गेलेली माणसे, वास्तू आणि गावे आठवू लागतात. आयुष्याच्या धकाधकीने लतादीदींना आजोळपासून दूर केले होते. इच्छा असूनही त्यांना येणे मात्र शक्य झाले नाही. पण आजोळची सय त्यांच्या काळजात कायमच होती. त्यांचे पाय गावाला लागावेत म्हणून ग्रामस्थांनीही खूप प्रयत्न केले. पण अखेरपर्यंत दीदींचे आजोळ त्यांच्यापासून दूरच राहिले.''

- सचिन पाटील, शिरपूर

तापी नदीकाठावरील थाळनेर (ता. शिरपूर) हे लतादीदींचे (Lata Mangeshkar) आजोळ. फारुकी राजवटीत खानदेशची राजधानी असलेले हे गाव तेथील हाजिरे, भुईकोट किल्ला यामुळे राज्यात प्रसिद्ध आहे. पण त्याला देशपातळीवर कीर्ती मिळाली ती लतादीदींच्या आई माई मंगेशकर यांचे माहेर म्हणूनच! तेथील (कै.) हरिदास रामदास लाड यांना दोन मुली होत्या. मोठी नर्मदा आणि धाकटी शेवंती. दोघींचे जन्मदाखले थाळनेरच्या जिल्हा परिषद शाळेत आहेत. नर्मदेचा विवाह १९२२ मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याशी झाला. चार वर्षे दोघांचा संसार चालला. त्यानंतर प्रसूतीदरम्यान नर्मदेचा मृत्यू झाला. विधुर दीनानाथांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यासाठी १९२७ मध्ये शेवंती तथा माई मंगेशकर यांचा विवाह दीनानाथांशी करून देण्यात आला. त्यानंतर गायन क्षेत्रात नशीब काढण्यासाठी दीनानाथ मध्य प्रदेशातील इंदूर येथे पोचले. लग्नानंतर शेवंती हे नाव बदलून शुद्धमती असे नवे नाव माई मंगेशकरांना देण्यात आले. प्रसूतीसाठी सुविधा नसल्यामुळे माई मंगेशकरांना घेऊन दीनानाथ इंदूरकडे रवाना झाले. २८ सप्टेंबर १९२९ ला दीनानाथ-शुद्धमती या दांपत्याच्या पोटी इंदूर येथे लतादीदींचा जन्म झाला.

Lata Mangeshkar
लतादीदींच्या पत्रातून उलगडल्या नाशिकमधील आठवणी | Lata Mangeshkar
माई आणि लता मंगेशकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेली जिल्हा परिषदेची शाळा.
माई आणि लता मंगेशकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेली जिल्हा परिषदेची शाळा. esakal

माई मंगेशकरांनी थाळनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एकमध्ये शिक्षण घेतले होते. त्याच शाळेत लतादीदींनी प्रवेश घेतला. पाचवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर त्या कुटुंबासह कोल्हापूरकडे रवाना झाल्या. तेथून थाळनेरशी असलेला त्यांचा प्रत्यक्ष संपर्क तुटला. १९४२ मध्ये दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. त्या वेळी लतादीदी १३ वर्षांच्या होत्या. आई, तीन बहिणी व एक भाऊ अशा पाच जणांची जबाबदारी बालवयातच अंगावर पडली. पण खचून न जाता त्या तडफदारपणे उभ्या राहिल्या. स्थिरस्थावर होण्यासाठी संघर्ष सुरू झाला आणि आजोळ दूर, दूर होत गेले. गावातील मालकीचे घर, सुमारे १८ एकर शेती त्यांनी विकून टाकली.माईंचे माहेर म्हणून थाळनेर लतादीदींच्या मनाचा एक कोपरा व्यापून होते. या गावासाठी काहीतरी रचनात्मक काम झाले पाहिजे, असा विचार त्यांनी प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर यांच्याकडे बोलून दाखविला होता. ६ मे २००३ ला थाळनेर येथे झालेल्या धनगर समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात महानोर यांनी लतादीदींच्या इच्छेची माहिती दिली होती. थाळनेर येथील खंडेराव महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लतादीदींनी मदत दिली आहे. त्यावर माई मंगेशकर यांनी वडील (कै.) हरिदास लाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंदिर बांधल्याची कोनशिला लावली आहे. थाळनेरचे किल्लेदार असलेल्या जमादारांवर रचलेल्या जात्याच्या ओव्या आजीकडून माईंकडे आणि माईंकडून लतादीदींकडे आल्या होत्या. राज्यसभेचे माजी खासदार (कै.)शिवाजीराव पाटील व थाळनेरचे माजी सरपंच एकनाथसिंह जमादार यांनी मुंबई येथे भेट घेतली असता लतादीदींनी त्या अहिराणी भाषेतील ओव्या अस्खलितपणे गाऊन दाखविल्या.

खंडेराव मंदिरावर लतादीदींच्या मदतीने माई मंगेशकर यांनी बसविलेली कोनशिला.
खंडेराव मंदिरावर लतादीदींच्या मदतीने माई मंगेशकर यांनी बसविलेली कोनशिला.esakal

हृदयनाथ मंगेशकरांची भेट

पूर्वी व्याप आणि नंतर वार्धक्य यामुळे लतादीदी थाळनेरला येऊ शकल्या नाहीत. मात्र हृदयनाथ मंगेशकर यांनी दोनदा थाळनेरला भेट दिली. २००१ मध्ये लतादीदींच्या वाढदिवशी ते पत्नी भारती मंगेशकर यांच्यासह थाळनेरला होते. गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या गुदामाच्या परिसरातील माईंचे माहेरचे घर, माईंनी स्वहस्ते लावलेले लिंब व पिंपळाचे झाड, ऐतिहासिक गणेश मंदिर त्यांनी डोळे भरून पाहिले होते. लतादीदींनी थाळनेरला एकदा तरी भेट द्यावी, अशी विनंती थाळनेरकरांनी त्यांना केली होती. हृदयनाथच नव्हे तर वेगवेगळ्या निमित्ताने भेट देणारे बाबासाहेब पुरंदरे, ना. धों. महानोर यांनाही थाळनेरकरांनी लतादीदींना घेऊन येण्याबाबत साकडे घातले होते. पण अखेरपर्यंत तो योग जुळलाच नाही. दीदींचे आजोळ दूरच राहिले...

दीदींवर श्रद्धा

ज्यांच्यामुळे गावाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली, त्या दीदी समक्ष भेटल्या नाहीत तरी थाळनेरकरांची त्यांच्यावरील श्रद्धा मात्र अभंग राहिली. थाळनेरच्या ऐतिहासिक गणेश मंदिरात मोरेश्वर भावे या निवृत्त शिक्षकांनी लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक कलावंतांचा संगीत महोत्सव भरविण्याचा उपक्रम तब्बल २५ वर्षे राबविला. वाढदिवसानिमित्त गणेश मंदिरात सहस्रावर्तन करून त्याचा प्रसाद दीदींपर्यंत पोचविला जात असे. कोविड संसर्ग झाल्याचे कळल्यानंतर गावातील सर्व मंदिरांत त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आल्या. लतादीदींच्या निधनाचे वृत्त कळताच गावावर शोककळा पसरली. गावात दुखवटा जाहीर करण्यात आला. सोमवारी (ता. ७) ग्रामपंचायत व गावातर्फे त्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

माई मंगेशकरांचे माहेर असलेले घर शाबूत असताना घेतलेले छायाचित्र.
माई मंगेशकरांचे माहेर असलेले घर शाबूत असताना घेतलेले छायाचित्र.esakal
Lata Mangeshkar
लतादीदींच 'ते' ट्विट चर्चेत | Lata Mangeshkar

''दीदींशी प्रत्यक्ष भेट झाली होती. त्यांच्याकडून अहिराणी ओव्या ऐकायला मिळाल्या तो आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा दिवस होता. त्यांच्याशी संपूर्ण गावाचे ऋणानुबंध होते. त्या थाळनेरला येऊ शकल्या नाहीत याची रुखरुख प्रत्येकाला आहे.'' - एकनाथसिंह जमादार, माजी सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com