esakal | मोठी बातमी! "या' आमदारांना मिळते दरमहा एक लाखाचे घरभाडे! 
sakal

बोलून बातमी शोधा

Amdar

मुंबईतील आमदार निवासात 180 आमदारांसाठी घरे असून त्या ठिकाणी नव्याने काम सुरू होणार आहे. तत्पूर्वी, राज्यातील सुमारे 135 आमदारांना दरमहा निवास भाडे म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये दिले जातात. लॉकडाउनमध्ये त्यांना भाडे द्यायचे की नाही, याबाबत सरकार निर्णय घेईल. 

मोठी बातमी! "या' आमदारांना मिळते दरमहा एक लाखाचे घरभाडे! 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : लॉकडाउनमुळे आमदारांच्या बैठका होत नसून, बहुतांश आमदार मूळगावी राहात आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमदार निवासात घरे न मिळालेल्या सुमारे 135 आमदारांना दिले जाणारे प्रत्येकी एक लाखाचे घरभाडे देऊ नये, असा सूर निघू लागला आहे. 

हेही वाचा : सोलापूर भाजपत देशमुखी, कारभार होईल का एकमुखी? 

राज्यातील कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविला आहे. राज्याच्या तिजोरीत दरमहा सरासरी 28 ते 30 हजार कोटींचा महसूल जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, लॉकडाउनमुळे मागील तीन महिन्यांत तिजोरीत सुमारे 28 हजार कोटींचाच महसूल जमा झाला आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणारा खर्च कसा भागवायचा, असा यक्षप्रश्‍न सत्ताधाऱ्यांपुढे उभारला आहे. त्यामुळे सरकारने अनेक योजनांच्या निधीत कपात केली असून, बहुतांश भांडवली कामेही थांबविली आहेत. काटकसरीने खर्च केला जात असून आता कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सोलापूरसह अन्य काही शहर-जिल्ह्यांतून पुन्हा एकदा काही दिवस कडक लॉकडाउनची मागणी होत आहे. त्याचा थेट परिणाम राज्याच्या तिजोरीवर होणार असल्याने आमदारांचे निवास भाडे काही महिने देऊ नये, याचा निर्णय विचाराधिन असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा : मी छोटा पण, कोरोना योद्धा मोठा..! बक्षिसाच्या रकमेतून बालकाने काय केले वाचा 

135 आमदारांना मिळते प्रत्येकी एक लाखाचे घरभाडे 
मुंबईतील आमदार निवासात 180 आमदारांसाठी घरे असून त्या ठिकाणी नव्याने काम सुरू होणार आहे. तत्पूर्वी, राज्यातील सुमारे 135 आमदारांना दरमहा निवास भाडे म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये दिले जातात. लॉकडाउनमध्ये त्यांना भाडे द्यायचे की नाही, याबाबत सरकार निर्णय घेईल. 
- रवींद्र जगदाळे, अव्वर सचिव 

राज्यातील आमदारांची स्थिती 

  • एकूण आमदार : 366 
  • आमदार निवासातील घरांची क्षमता : 180 
  • घरभाडे मिळणारे आमदार : 135 
  • दरमहा दिले जाणारे घरभाडे : 1,00,000 

नव्या माजी आमदारांची पेन्शनही लांबणीवर 
राज्य सरकारच्या निर्णयानुसार पाच वर्षे आमदार राहिलेल्या माजी आमदारांना दरमहा प्रत्येकी 50 हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. तर दहा वर्षे आमदार राहिलेल्यांना दरमहा 60 हजार रुपये, 15 वर्षे आमदार राहिलेल्यांना 70 हजार रुपये पेन्शन दिली जाते. सद्य:स्थितीत राज्यातील 800 माजी आमदारांना पेन्शन दिली जाते. मात्र, मागील निवडणुकीत माजी आमदार झालेल्यांना पेन्शनची संपूर्ण रक्‍कम मिळालेली नाही. सांगोला (जि. सोलापूर) या विधानसभा मतदारसंघाचे 51 वर्षे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार गणपतराव देशमुख यांना दरमहा एक लाख 42 हजार रुपयांची पेन्शन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांना आतापर्यंत केवळ दोन महिन्यांचीच पेन्शन मिळाली आहे.