काहीजण सोडून गेले, पण तुम्ही सह्याद्रीच्या कड्यासारखे टिकून राहिलात; वर्धापनदिनी राज ठाकरेंचा भावनिक संदेश!

Raj_Thackeray
Raj_Thackeray

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५वा वर्धापनदिन आज साजरा होत आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा मनसैनिकांचा सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. पण राज ठाकरेंसह मनसैनिकांमध्ये वर्धापनदिनाचा उत्साह तसाच असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसेचा आजपर्यंचा प्रवास उलगडला आहे. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप त्यांनी सोशल मीडियात शेअर करत कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

राज ठाकरेंचा मनसैनिकांना संदेश जसा आहे तसा

माझ्या तमाम बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...

माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र!

आज आपल्या पक्षाचा १५ वा वर्धापन दिन, त्याबद्दल तुम्हा सर्वांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. बघता बघता आपण सगळ्यांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्नाला आज पंधरा वर्षे पूर्ण झाली. पंधरा वर्षापूर्वी जेव्हा आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा खरंच सांगतो, मनात एक धाकधूक होती. मी एका ध्येयाने बाहेर पडून महाराष्ट्रासाठी नवं असं काहीतरी उभं करायला निघालो होतो. पण तुम्ही  सगळे कसं स्वीकाराल, लोकं कसं स्वीकारतील, ही एक मनात धाकधूक होती, पण १९ मार्च २००६च्या पक्ष स्थापनेनंतरच्या शिवतिर्थावरच्या सभेत मी व्यासपीठावरती पाऊल ठेवलं. समोर पसरलेला अलोट जनसमुदाय पाहिला आणि मनातील शंका दूर झाली. माझ्यासह कोणालाही हेवा वाटेल, अशी महाराष्ट्र सैनिकांची अचाट शक्ती होती. या शक्तीचा माझ्यावर अढळ विश्वास आहे, याची मला खात्री पटली. 

गेल्या पंधरा वर्षात माझी महाराष्ट्र सैनिकरुपी संपत्ती माझ्यासोबत टिकून आहे. ती कितीही खचखळगे आले, अडचणींचा डोंगर समोर उभा राहिला तरी माझ्यासोबत आहे, याच्या इतकी आनंदाची दुसरी बाब ती काय? आपल्यातले काहीजण सोडून गेले, जाऊ देत, त्यांना त्यांचा निर्णय त्यांना लखलाभ ठरो, पण जे माझ्यासोबत सह्याद्रीच्या कड्यासारखे टणकपणे टिकून आहेत, त्यांना मी इतकंच सांगीन की, मी तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि पक्षाला जे जे यश भविष्यात मिळेल, त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल. तुमच्याच हातून जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र मी घडविन, हे माझं तुम्हाला वचन आहे.

मी मनापासून सांगतो की, तुम्ही जे पंधरा वर्षात करून दाखवलं आहे, ते अफाट आहे, अचाट आहे. कोणतीही धनशक्ती पाठीशी नसताना, राजकीय पार्श्वभूमी नसताना, स्वतःचा नोकरी-व्यवसाय सांभाळून तुम्ही समाजकारणात आणि राजकारणात स्वतःला ज्या पद्धतीने रुजवलंत ते खरंच कौतुकास्पद आहे. हजारो आंदोलनं, महाराष्ट्रभर शेकड्यांनी निघालेले मोर्चे, अटकसत्र, जेलच्या वाऱ्या आणि हे सगळं कशासाठी? तर आपल्या भाषेसाठी, आपल्या मराठी माणसांच्या हितासाठी, त्यांच्या न्याय-हक्कांसाठी आणि स्वधर्म रक्षणासाठी. या सगळ्यासाठी तुमच्या बद्दल माझ्या मनात कृतज्ञता तर आहेच आणि ती आयुष्यभर राहील, पण मी खात्रीने सांगतो की, महाराष्ट्राच्या मनात देखील तुमच्याबद्दल कृतज्ञतेची भावना सदैव राहील. 

आपण निवडणुकीत यश पाहिलं, पराभव पाहिला, आणि पराभव पचवून देखील तुमच्यातील लढायची उर्मी कमी झाली नाही, याचा मला खरंच अभिमान आहे. महाराष्ट्रातील आजही प्रत्येक घटकाला जेव्हा वाटतं की, आमचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच सोडवू शकते, त्यातच भविष्यातील उष:कालाची बीजं रोवली आहेत, हे आपण विसरू नका. तुमचे श्रम, घाम, रक्त हे वाया जाणार नाहीत. या सगळ्या १५ वर्षांच्या प्रवासात तुमच्या घरच्यांनी देखील खूप त्याग केला, खूप सोसलं आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना देखील सांगू इच्छितो की, आपला प्रवास खडतर आहे, पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे आणि आशीर्वादामुळे आमच्या पंखात आली आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही सगळी आव्हानं सहज पेलून पुढे जाऊ.

बाकी कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे हा पहिलाच वर्धापन दिन आहे, जेव्हा आपण भेटू शकत नाही आहोत. मला कल्पना आहे तुम्ही मला भेटायला आतुर असाल, मीही आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता गर्दी टाळणं आवश्यक आहे, हे तुम्हीही मान्य कराल. तुम्हाला समोर पाहता येणार नाही, प्रत्यक्ष भेटता येणार नाही आणि म्हणूनच हा रेकॉर्डेड संदेशाचा मार्ग स्वीकारला आहे. पण ही परिस्थिती निवळली की आपण भेटणार आहोत हे नक्की. ते देखील मोठ्या संख्येत. तोपर्यंत स्वतःची, स्वतःच्या कुटुंबीयांची तसेच आपल्या विभागातील नागरिकांची काळजी घ्या. 

या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १४ मार्चपासून आपण पक्षाची सदस्य नोंदणी पुन्हा एकदा सुरू करत आहोत. सदस्य नोंदणी म्हणजे एका अर्थाने आपण महाराष्ट्राला दिलेलं एक आश्वासन, एक वचन, व्यक्त केलेली एक बांधिलकी. याबाबतचा फॉर्म कसा भरायचा याची चित्रफित आज-उद्यापर्यंत आपल्या सर्वांच्या हातात पोहोचेलच. त्यातल्या सूचना नीट ऐका. समजून घ्या, समजावून सांगा. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या या मंगल कार्यात सर्वांना सामावून घ्या. तुम्हाला पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. 

सदैव आपला नम्र,
राज ठाकरे.
जय हिंद, जय महाराष्ट्र 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com