
''तुम्हारे हर पाप का सवाल...'' मोहित कंबोज यांचा मलिकांवर पलटवार
मुंबई : मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज सकाळीच एक ट्विट केलं असून त्यांच्या ट्विटची चर्चा रंगली आहे. ''बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे'', असं ट्विट मलिकांनी केलं आहे. त्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी या ट्विटवरून मलिकांवर निशाणा साधला आहे. ''तुमच्या प्रत्येक पापाबाबत प्रश्न विचारला जाईल'' असं त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत. दररोज एक नवीन ट्विट करत वानखेडे कुटुंबीयांबाबत नवीन दावा करतात. तसेच दोनच दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर देखील आरोप केले होते. त्यांनी अमृता फडणवीसांचा एक फोटो ट्विट करत त्यामध्ये एक ड्रग्स पेडलर व्यक्ती असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते. आज आणखी त्यांनी एक नवीन ट्विट केले आहे. ''बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे'', असं मलिक म्हणाले.
मलिकांना कंबोज यांचं उत्तर -
आज सकाळीच नवाब मलिकांनी ट्विट करताच मोहित कंबोज यांनी मलिकांचं ट्विट रिट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आता तुम्ही घाबरू नका आणि पळून जाऊ नका. तुम्ही केलेल्या प्रत्येका पापाबाबत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, असं कंबोज म्हणाले. त्यांनी ''अब बात निकल गए है और अब दूर तलक ही जायेगी, अब डरो मत भागो मत, तुम्हारे हर पाप का सवाल पूछा जाएगा'' असं ट्विट केलं आहे.