esakal | मॉन्सूनने ओलांडली महाराष्ट्राची सीमा
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra

मॉन्सूनने ओलांडली महाराष्ट्राची सीमा

sakal_logo
By
योगीराज प्रभुणे

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्राची सीमा गुरुवारी ओलांडून उत्तरेकडे प्रवास सुरू केला. त्याच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण असून लवकरच तो गुजरात, मध्य प्रदेश, ओरिसाचा उर्वरित भागात हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. मॉन्सूनने आतापर्यंत गुजरातच्या दक्षिण भागातील सुरत, तेलंगण, मध्य प्रदेशाचा दक्षिण भाग व परिसर, छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशापर्यंत मजल मारली आहे. पुढील एक ते दोन दिवसांत आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होईल. (Monsoon crosses maharashtra borders Chance of torrential rains in Konkan, Vidarbha)

हेही वाचा: पुण्यात आज 60 केंद्रावर मिळणार कोविशील्ड, 16 ठिकाणी कोव्हॅक्सीन

मॉन्सून महाराष्ट्रात ५ जून रोजी दाखल झाला. त्यानंतर त्याने अलिबाग, पुणे, सोलापूर, उस्मानाबादपर्यंत वाटचाल केली. त्यानंतर दोन दिवस वाऱ्याचा वेग मंदावला होता. बुधवारी मॉन्सूनने पुन्हा वेगाने वाटचाल सुरू केली असून, मुंबईसह संपूर्ण कोकण, मालेगाव, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात नागपूरपर्यंतचा बहुतांशी भाग व्यापला होता. गुरुवारीही मॉन्सूनने चांगलीच प्रगती केल्यानंतर राज्यातील सर्वच भाग व्यापून उत्तरेकडे वेगाने सरकला आहे.

हेही वाचा: पुण्यात ग्रामीण भागात निर्बंध शिथिल होणार? आज होणार निर्णय

राज्यातील बहुतांशी भागांत मंगळवारनंतर जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईतही दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली असून, अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या मॉन्सूनला उत्तरेकडे सरकण्यासाठी पोषक वातावरण आहे. पुढील दोन दिवसांत गुजरातचा अनेक भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या अनेक भागांत दाखल होईल. तसेच पश्चिम बंगाल आणि झारखंड तसेच बिहारच्या काही भागांत, पूर्व उत्तर प्रदेशाच्या भागात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे उत्तर भागातील अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.