Breaking: MPSCची संयु्क्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

MPSC
MPSC

MPSC Exam 2021: मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 एप्रिलला ही परीक्षा होणार होती. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह इतर नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हेसुद्धा बैठकीला उपस्थित होते. आजची मंत्रिमंडळ बैठक केवळ एमपीएससी परीक्षेबाबत बोलावण्यात आली होती.

शालेय परीक्षांबाबत काय निर्णय होईल, याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, आज दहावी, बारावी परीक्षेबाबत नाही, तर एमपीएससीच्या परीक्षेबाबत चर्चा झाली. बैठक ऑनलाइन झाली असून यावेळी अनेक मंत्री उपस्थित होते. ११ एप्रिलला संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून वारंवार करण्यात येत होती.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दुसरीकडे लसींचा तुटवडाही जाणवत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे तसेच राज्याच्या इतर भागातील विद्यार्थ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपासून या मागणीने जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 

दरम्यान, गेल्या महिन्यात १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या निर्णयाविरोधात राज्यभरातील लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. राज्यव्यापी आंदोलनानंतर राज्य सरकारने निर्णय बदलत २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार ती परीक्षा पार पडली. 

११ एप्रिलला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा होणार की नाही, याबाबत अनेक उलटसुलट चर्चा होत होत्या. दोन वर्षांनी ही परीक्षा होत असल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षेसारखी ही परीक्षा पुढे ढकलू नये अशी मागणी करण्यात येत होती. 

दुसरीकडे सोशल मीडियावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेना टॅग करत अनेक उमेदवारांनी परीक्षा रद्द करावी, अशी मागणी केली होती. याबाबत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोनद्वारे संपर्क केल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू होती. राज्यात कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याने अखेर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com