ज्येष्ठ अभिनेते, निर्माते प्रा. तोरडमल यांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 जुलै 2017

मुंबई - 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', "गुड बाय डॉक्‍टर', "गोष्ट जन्मांतरीची' अशा काही नाटकांबरोबरच "सिंहासन', "आत्मविश्‍वास', "बाळा गाऊ कशी अंगाई' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते तसेच लेखक व दिग्दर्शक-निर्माते प्रा. मधुकर तोरडमल (वय 84) यांचे आज सायंकाळी वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी प्रमिला, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर जुहू येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रा. मधुकर तोरडमल यांनी लिहिलेल्या "तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकाचे पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले. या नाटकात त्यांनी साकारलेली इरसाल प्रा. बारटक्केची भूमिका खूपच गाजली. नाट्यसृष्टीमध्ये त्यांना "मामा' या नावानेच ओळखत असत.

अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि अनुवादक अशी चौफेर त्यांची वाटचाल होती. आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने त्यांनी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टी गाजविली. त्यांनी रसिक रंजन या नाट्यसंस्थेची स्थापना केली.

गेले काही दिवस मधुकर तोरडमल आजारी होते. एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली होती. वयोमानामुळे रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले होते. गेले दोन दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. काल सायंकाळपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेर आज सायंकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात आली. एक चतुःरस्र व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली. उद्या सकाळी दहा ते अकरा या वेळेत त्यांचे पार्थिव माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले - मुख्यमंत्री
ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, अभिनय, लेखन आणि अनुवाद अशा तिन्ही प्रांतांत प्रा. तोरडमल यांनी दिलेले योगदान वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रा. तोरडमल यांना मराठी रंगभूमी आणि साहित्य समृद्ध करण्याचा ध्यास होता. "तरुण तुर्क, म्हातारे अर्क' या त्यांनीच लिहिलेल्या नाटकातील त्यांची प्रा. बारटक्के ही व्यक्तिरेखा कायम स्मरणात राहील. नाट्यलेखनाबरोबरच त्यांनी कादंबरी, चरित्र आणि अनुवाद असे साहित्यप्रकार ताकदीने हाताळले.

उपेंद्र दाते - (अभिनेते) - अभिनयाच्या बाबतीत तर त्यांचे काम सगळ्यांनीच रंगभूमीवर आणि रूपेरी पडद्यावर मराठी चित्रपटातून पाहिलेले आहेच. अतिशय उमद्या व्यक्तिमत्त्वाचे ते होते. दिग्दर्शन, निर्मिती, लेखन या सगळ्यातच त्यांचा हातखंडा होता. त्यांच्याबद्दल मी बोलेन तेवढे कमीच आहे. त्यांच्या अगदी शेवटच्या दोन दिवसांमध्ये मी त्यांच्या बरोबर होतो. ते आजारी पडल्यानंतर मी त्यांना विरंगुळ्यासाठी महाभारत, डॉ. श्रीराम लागू आणि विजया मेहता यांची आत्मचरित्रे वाचून दाखविली. त्या वाचनाने त्यांना नवीन कल्पना सुचू लागल्या होत्या; पण त्यानंतर त्यांची शारीरिक परिस्थिती खालावल्याने ते सगळे तसेच राहून गेले. 

राजन पाटील- (अभिनेते) - माझ्या त्यांच्याबरोबरच्या आठवणी मी सांगेन तेवढ्या थोड्या आहेत. मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा "तरुण तुर्क, म्हातारे अर्क' या नाटकासाठी काम केले. आमची पाच जणांची गॅंग होती. मामा तोरडमल, अतुल परचुरे, मोहन जोशी, सुनील तावडे आणि मी. मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. माणूस म्हणून तर ते ग्रेट होतेच; पण एक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणूनही ते खूप ग्रेट होते. 

प्रमोद पवार - विलक्षण बुद्धिमत्ता असलेला लेखक आणि दिग्दर्शक. अगदी परवाच मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा त्यांनी अकरावीमध्ये केलेल्या नाटकाची आठवण मला सांगितली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांना ती आठवण लक्षात यावी याचे मला आश्‍चर्य वाटले. यावरून त्यांची बुद्धिमत्ता किती तीक्ष्ण होती याची कल्पना येते. माझ्या करिअरला कलाटणी मिळाली ती त्यांच्यामुळेच. 

अशोक शिंदे - आपल्या इंडस्ट्रीत काही "पीलर्स' (खांब) आहेत त्यापैकीच मधुकर तोरडमल हे होते. आता हा एक पीलर्स आपल्यातून गेला आहे. त्याचे दुःख आहे. त्यांनी चित्रपटामध्ये कामे केलीच शिवाय रंगभूमीवर त्यांनी केलेले काम कुणीच विसरणार नाही. रंगभूमीवरचा एक बादशहा गेला, असे मला वाटते.

Web Title: mumbai maharashtra news madhukar toradmal death