सर्वेक्षणाचा निष्कर्ष : पुरुषांनी घरकामात समानवाटा उचलावा; राज्यातील ९० टक्के महिलांची अपेक्षा

योगेश बरवड
Monday, 25 January 2021

३७ टक्के महिलांना कुटुंबीयांकडून अधिक पाठिंबा आणि प्रोत्साहनाची अपेक्षा आहे. डिसेंबर २०२० मध्ये नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबाद या शहरांमध्ये १,२०० महिलांना सर्वेक्षणात सहभागी करून घेतले.

नागपूर : घरातील कामांमध्ये पुरुषांनी समान वाटा उचलावा, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील दर १० पैकी ९ महिलांनी व्यक्त केली आहे. नागपूरच्या ८९ महिलांचीही तिच अपेक्षा आहे. अलीकडे राज्यातील १० शहरांमध्ये केलेल्‍या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष पुढे आला आहे.

सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीनुसार राज्यातील दर १० पैकी ६ महिलांना स्वयंपाकातील वेळ वाचवून आवडीनिवडींच्या कामासाठी तो वापरणे आवडेल. ४० ते ४५ वयोगटातील ६१ टक्के महिला त्यांचा बहुतांश वेळ घरातील कामे, विशेषत: स्वयंपाक आणि मुलांची काळजी घेण्यात घालवतात. खरे तर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्क्यांहून अधिक महिलांना फक्त गृहिणी न राहता त्यापलीकडे काहीतरी करायचे आहे.

विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

सर्वेक्षणानुसार नागपूरच्या ४१ टक्के महिलांच्या मते स्वयंपाकात कमी वेळ घालवल्याने त्यांना वैयक्तिक आवडींना वेळ देता येईल. नाशिकच्या ८४ टक्के महिलांनी असेच मत नोंदवले. ६५ टक्के महिलांना त्यांनी बनवलेले अन्न अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी वाटते. मात्र, आपल्या महत्त्वाकांक्षा जोपासण्यासाठी त्यांना घरगुती कामांमध्ये जाणारा वेळ कमी करायचा आहे.

३७ टक्के महिलांना कुटुंबीयांकडून अधिक पाठिंबा आणि प्रोत्साहनाची अपेक्षा आहे. डिसेंबर २०२० मध्ये नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबाद या शहरांमध्ये १,२०० महिलांना सर्वेक्षणात सहभागी करून घेतले.

जाणून घ्या - Success Story : आईने अंगावरील सोनं गहाण ठेवून शिकवले पोरीला अन् तिने कमालच केली

महत्त्वाचे निष्कर्ष

  • ८० टक्के महिला स्वतः स्वयंपाक करतात, हा पर्याय त्यांना आरोग्यदायी वाटतो. आहे आणि सध्या मदतनीसही नाहीत 
  • स्वयंपाकासाठी दरदिवशी १०० मिनिटे आणि मुलांच्या सांभाळासाठी १३३ मिनिटे लागतात. हीच सर्वाधिक गुंतवून ठेवणारी कामे आहेत. 
  • साफसफाई आणि अधिकच्या स्वयंपाकामुळे सणासुदीत अधिक कामे असल्याचे ९७ टक्के महिलांना वाटते. 
  • द्वितीय श्रेणी शहरातील महिला घरात लिंगसमानतेचा पुरस्कार करतात. पुरुषांनीही घरातील कामांमध्ये साह्य करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. 
  • तरुण पुरुष घरातील महिलांना घरगुती कामांमध्ये अधिक साह्य करतात. २१ ते २५ वयोगटातील ७४ टक्के महिलांना पुरुषांकडून साह्य मिळते. 
  • महाराष्ट्रातील ६४ टक्के महिलां एकट्या असताना करिअर, आवड, छंद यासाठी वेळ देतात. 
  • लग्नानंतर कुटुंबाला ५४ टक्के आणि मुलांसाठी ५७ टक्के प्राधान्य देतात.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur news ninety percent of women expect men to share equally in housework