एकनाथ खडसे, पंकजा मुंडे अहंकारी नेते; संघाच्या मुखपत्रातून टीका

Untitled-2.jpg
Untitled-2.jpg

मुंबई : गोपीनाथ गडावर घेतलेल्या कार्यक्रमात भाजप नेते
एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनी पक्षावर जोरदार हल्ला केला.
यावरून आता पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.
यावरून आता या दोघांना अहंकारी नेते म्हणून संघाचे मुखपत्र 
असणाऱ्या तरुण भारत या दैनिकाने या दोघांना लक्ष्य केले आहे.

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर केलेल्या मनोगतात या दोघांनी सध्याच्या स्थितीचे अजिबात परिक्षण केले नसल्याची टीका तरुण भारत मध्ये कऱण्यात आली आहे.

एकनाथ खडसे यांच्या मुलीचा म्हणजेच रोहीणी खडसे, पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे शल्य  या दोघांनी येथील कार्यक्रमात बोलून दाखविले. तसेच या झालेल्या पराभवाचे खापर दोघांनी भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर फोडले. यावरून संघाच्या मुखपत्रातून दोघांवर चांगलीच टीका करण्यात आली आहे.

अग्रलेखात काय-  एकनाथ खडसे यांची मुलगी व पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या आणि एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजपा बहुजनांचा पक्ष झाला असता का? आता यापैकी काहीच नाही, तर तो एकदम ‘मूठभर’ लोकांचा झाला का? वस्तुस्थिती ही आहे की, या दोघांनाही विस्थापित करणारे जे नेतृत्व उभे झाले आहे तेही बहुजन समाजाचेच आहे, हे यांच्या लक्षातच येत नाही. काळ वेगाने बदलत आहे. मतदारांची मानसिकता, आशा-अपेक्षा खूप बदलत चालल्या आहेत. याची जाण या दोघांनाही नाही, असेच दिसून येते. अशी टीका या दोघांवर करण्यात आली.

दरम्यान तरुण भारतच्या अग्रलेखात म्हटले आहे की, अहंकार खाली पाहू देत नाही आणि खाली पाहिल्याशिवाय आत्मपरीक्षण करता येत नाही. कारण, अहंकारी व्यक्तीला समोरच्याचेच दोष दिसतात. त्यामुळे स्वत:चे काही चुकले का, स्वत:त काही कमतरता राहिली का, हे बघण्यासाठी संधीच मिळत नाही. गुरुवारी, परळीजवळील गोपीनाथ गडावर, गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी जे मनोगत व्यक्त केले, त्यात या दोघांनी आपल्या सद्य:स्थितीचे परीक्षण केल्याचे अजीबात जाणवले नाही.

पुढे अग्रलेखात असे म्हणण्यात आले आहे की, आपण कुणाला काय दिले, कुणासाठी काय काय केले, हे आपण आपल्या तोंडाने सांगायचे नसते, अगदी राजकारणातही. उलट, ते लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि आपण, पक्षाने मला किती दिले, याचीच सतत जाहीर उजळणी करायची असते. हा विधिनिषेध सर्वसामान्य कार्यकर्त्याने पाळला नाही तर एकवेळ चालून जाते. परंतु, जेव्हा आपण स्वत:ला ‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री’ असे नामाभिधान लावून घेतो किंवा ‘मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो’ असे आत्ममुग्ध विधान करतो, तेव्हा तर हा विधिनिषेध कटाक्षाने पाळायचा असतो. अगदी आजच्या प्रचलित भाषेत बोलायचे, तर या मेळाव्यात पंकजा मुंडे व नाथाभाऊ जे काही बोलले, ते ‘पोलिटिकली इन्करेक्ट’ (राजकीयदृष्ट्या अयोग्य) असेच होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com