esakal | Navratri 2021 - आस भेटीची..! दर्शनासाठी जाताय? त्याआधी जाणून घ्या नियम
sakal

बोलून बातमी शोधा

आस भेटीची..! दर्शनासाठी जाताय? त्याआधी जाणून घ्या नियम

राज्यातील मंदिरे आजपासून उघडली जात असली तरी काही मंदिरांमध्ये ऑनलाइन बुकिंगद्वारे मर्यादित भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे.

आस भेटीची..! दर्शनासाठी जाताय? त्याआधी जाणून घ्या नियम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

घटस्थापनेच्या मुहुर्तावर राज्यातील सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होत असून कोरोनाचे नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील मंदिरे आजपासून उघडली जात असली तरी काही मंदिरांमध्ये ऑनलाइन बुकिंगद्वारे मर्यादित भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. याशिवाय सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असणार आहे.

कोल्हापूर - साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज(ता. ७) शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास घटस्थापना होणार असून, यावेळी परंपरेप्रमाणे तोफेची सलामी दिली जाणार आहे. कोरोना नियमांचे पालन करतच भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असून, त्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. पहिल्या तासात चार हजारांहून अधिक भाविकांनी ऑनलाईन बुकिंग केले. रात्री नऊपर्यंत तीस हजार भाविकांनी बुकिंग केले होते. त्यामुळे उत्सवातील पहिल्या तीन दिवसांतील दर्शनासाठी बुकिंग फुल्ल झाले आहे.

माहूर (जि.नांदेड) : माहूरगडवासिनी आई रेणुका देवीचा शारदीय नवरात्र उत्सव आजपासून सुरु झाला. या उत्सव काळात दररोज केवळ 16 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. साडेतीन पीठांपैकी एक पीठ असलेल्या माहूर (जि. नांदेड) येथील नवरात्र उत्सवाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माहूर येथे भेट देवून आढावा घेतला.

हेही वाचा: शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

तुळजापूर - तुळजा भवानी मंदीर समितीने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये पुजारी, सेवेधारी यांना 7 ऑक्टोबर ला सायंकाळी सहा वाजल्यापासून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. सोबत पुजार्यांनी ओळखपत्र ठेवणे आवश्यक आहे. तुळजा भवानी मंदिरात भाविकांचे गाभारा आणि मंदिर परीसरात कोणतेही कुलाचार, विधी , करता येणार नाहीत. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दुध॔र आजारग्रस्त व्यक्ती , गरोदर स्त्रियांना तसेच 10 वर्षाखालील बालकांना मंदीरात प्रवेश दिला जाणार नाही.

सप्तश्रृंगी देवी - साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ श्री सप्तशृंगी निवासिनी देवी संस्थानच्यावतीने कोविड १९ संदर्भांतील नियमांचे पालन करुन भाविकांना मंदीरात प्रवेश देण्यास सुरु केले आहे. सर्व भाविकांसाठी श्री भगवती मंदिरात प्रवेश करतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार असून, सोशल डिस्टंसिंगचे पालन गरजेचे असणार आहे.

मुंबईतील मंदिरांमध्ये प्रवेशाचे नियम आणि वेळ

मुंबादेवी मंदिर

वेळ - सकाळी ७ ते संध्याकाळी ६

बंदी कोणाला - १० वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील नागरिक, गर्भवती स्त्रिया.

निर्बंध - दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असावेत किंवा नजीकच्या काळात कोरोना चाचणी केली असावी.

प्रसाद-फुले स्वीकारली जाणार नाहीत व दिलेही जाणार नाही.

वेळ ठरवण्यासाठी वेबसाईट www.mumbadevi.org.in

महालक्ष्मी मंदिर

वेळ - सकाळी ६ ते रात्री १०

ऑनलाईन प्रवेश मर्यादा - ताशी ४५० ते ५०० भाविक.

बंदी कोणाला - १० वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील नागरिक, गर्भवती स्त्रिया.

निर्बंध - प्रसाद आणण्यास संमती नाही. फुले विशिष्ट ठिकाणीच ठेवावी लागतील, नंतर मंदिरातर्फे ती देवीला दाखवली जातील.

हेही वाचा: दर्शनासाठी जाताय? अशी आहे नियमांची साखळी; जाणून घ्या...

शेगाव -श्री गजानन महाराज मंदीर , श्री दर्शन सुविधा तुर्तास ई-दर्शन पासद्वारे राहील. प्रत्येक दर्शनार्थी भाविकांसाठी स्वतंत्र ई-दर्शन पास असणे बंधनकारक राहील. कोविड नियमानुसार सेवेत श्री महाप्रसाद सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहील. श्री दर्शनार्थी भाविकांकरीता पर्याय म्हणून पादत्राणे ठेवण्याची नियमानुकूल स्वतंत्र व्यवस्था केली आहे. प्रति दिवस नियमाप्रमाणे सरासरी ९,००० भाविकांना ई-दर्शन पासद्वारे श्रींचे दर्शनाचा लाभ घेता येईल.

आंबेगाव - बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग श्री. क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर ७ ऑक्टोबर पासून खुले झाले आहे. मंदिर सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून काम चालू असलेल्या रस्त्यापासून मंदिरा पर्यंतचा प्रवास करता येणार असून त्यामधून कोणालाही सूट दिली जाणार नाही.

अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर आज गुरुवारपासून काकड आरतीने भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. कोविड-19 ची नियमावली व शासनाचे निर्देश पाळून भक्तांना दर्शनासाठी पहाटे पाचपासून रात्री नऊपर्यंत मंदिरात सोडण्यात येणार असल्याची माहिती वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली.

नवरात्रासाठी नियमावली

गुरुवार (ता. ७) पासून नवरात्र महोत्सव सुरू होत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने उत्सव साजरा करावा असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. मंदिरापुढे नियमांचे पालन करून साधा मांडाव घालावा, नागरिकांची गर्दी होईल अशी सजावट करू नये, मंडळात ४ फूट तर घरात २ फुटापेक्षा मोठी मूर्ती असू नये. मूर्ती विसर्जन करताना पर्यावरण पूरक कृत्रिम हौदात करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

ट्रस्ट, धार्मिक व्यवस्थापन यांनी धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे केव्हा खुली असतील याची वेळ निश्चित करून याचे काटेकोर पालन करावे. धार्मिक स्थळांमध्ये येणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा, थर्मल गणने तपासणी करावी, सॅनिटाइजरची सुविधा असावी. तसेच याठिकाणी गर्दी होणार नाही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाईल याकडे लक्ष ठेवावे.

loading image
go to top