Navy Day : 'बिटींग रिट्रीट' सोहळ्याला रशियन नौदलाने लावले चार चाँद!

Navy-Day
Navy-Day

मुंबई : तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेले ‘गेट वे ऑफ इंडिया’, नौदलाच्या चेतक आणि सी-किंग हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती, ‘मार्कोस’ मरीन कमांडोंची प्रात्यक्षिके, कान तृप्त करणारे भारतीय तसेच रशियन नौदलाचे बॅण्डवादन आणि सुंदर नृत्याविष्कार, नौदल जवानांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे संचलन आणि ‘सी कॅडेट कॉर्प्स’चे नृत्य ही नेव्ही डेच्या ‘बिटींग रिट्रीट’ कार्यक्रमाची वैशिष्ट्ये ठरली.

1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान 4 डिसेंबर रोजी कराची बंदरावर हल्ल्याचे ‘ऑपरेशन ट्रायडन्ट’ भारतीय नौदलाने राबविले होते. या हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. ‘ऑपरेशन ट्रायडन्ट’ दरम्यान रशियन नौदलाचे सहाय्य मिळाले होते. रशियन नौदलाच्या बँड पथकाने यावर्षीच्या बिटींग रिट्रीट सोहळ्यात सहभाग घेतल्याने आजचा सोहळा अधिकच आकर्षक ठरला.

नौदलाच्या ‘चेतक’ आणि ‘सी-किंग’ हेलिकॉप्टरने विविध रचनांमध्ये हवाई कसरती केल्या. गेट वे ऑफ इंडियाच्या मागून ‘सी-किंग’ हेलिकॉप्टर झेपावले आणि त्यातून दोरीवरुन लटकत जवानांनी तिरंगा फडकावला. यावेळी त्यांनी केलेली पुष्पवृष्टी तसेच लाल- गुलाबी रंगांची उधळण डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.

हेलिकॉप्टरवरुन दोरीच्या सहाय्याने लटकत जवानांनी दाखविलेल्या कसरती, ‘मार्कोस’ कमांडोंनी दाखविलेली दहशतवादी हल्ला परतविण्याची तसेच बचावकार्याची प्रात्यक्षिके ही बिटींग रिट्रीट कार्यक्रमाची  वैशिष्ट्ये ठरली. नौदलाच्या बॅण्डपथकाने लयबद्ध आणि शिस्तबद्धरित्या संचलन करत केलेले वादन उपस्थितांची क्षणाक्षणाला दाद मिळवत होते. नौदल बँडचे सादरीकरण होत असतानाच ताजमहल पॅलेस हॉटेलच्या टेरेसवर ट्युबुलर बेलचे वादन झाल्यावर सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले.

मॅजिकल लाईट टॅटू ड्रमर्स पथकाने वादन करताना अंधाराच्या पार्श्वभूमीवर वाद्यांना लावलेल्या रंगीत दिव्यांची हालचाल दर्शकांना मंत्रमुग्ध करत होती. यावेळी जवानांनी बंदुकांसह कवायती केल्या. ‘सी-कॅडेट कॉर्प्स’चा सुंदर नृत्याविष्कार यावेळी पहायला मिळाला.

भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडतर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे नौदल दिनानिमित्त आयोजित ‘बिटींग रिट्रीट’ आणि टॅटू सेरेमनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पश्चिम कमांडचे प्रमुख व्हॉईस अॅडमिरल अजित कुमार यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com