आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल : शरद पवार (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 October 2019

आपला आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल, असे मला वाटते, असे सूचक विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. 

बारामती शहर : भाजप सेनेत जो सत्तेचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे उध्दव ठाकरे म्हणाले याचा अर्थ 50-50 टक्के जे काही असेल, मागच्या वेळेस शिवसेनेच्या चार दोन गोष्टी त्यांच्याकडून गेल्या, ते शिवसेना या वेळेस सहन करतील असे दिसत नाही, आपला आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल, असे मला वाटते, असे सूचक विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. 

नाशिकमध्ये शिवसेनेच्या अस्तित्वचा प्रश्न; खासदारांना इशारा

बारामतीतील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. सत्तेत सहभागी होणार का.? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, शेतक-यांचे प्रश्न भीषण झाले आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत, हजारो लोकांच्या हाताचे काम जात आहे, यासह राज्यापुढे इतरही अनेक प्रश्न आहेत, हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी जनमत तयार करण्याच्या कामावर राष्ट्रवादी कॉंग्रेस संघटनात्मक पातळीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 

भुजबळांसाठी गड आला पण, सिंह गेला

मुख्यमंत्र्यांवर टीका....
या निवडणूकीचे स्वरुप मुख्यमंत्र्यांनी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. लढाईच नाही, असेच तिचे स्वरुप करण्याचा प्रयत्न केला. समोर लढायला कुणी नाहीच, एकतर्फीच आहे, लोकांनाही असं वाटलं की एकतर्फीच निवडणूक आहे. निवडणूकीला सामोरे जाताना पक्षाला प्रभावी भूमिका मांडता आली नाही तर लोकांना दोष देता येणार नाही, ती आमची कमतरता असेल. ही कमतरता भरुन काढण्यासाठी यंदा आव्हान आहे आणि त्याला आपण सामोरे गेले पाहिजे, मी तसा गेलो आणि राज्यातील तरुणाईने मला प्रचंड प्रतिसाद दिला, याचा आनंद असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. 

राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना दोष देता येणार नाही, असे स्पष्ट करुन शरद पवार म्हणाले की महाराष्ट्र हा माझा घरचा भाग असल्याने येथे प्रचार ही माझी जबाबदारीच होती. मी हरियाणात प्रचाराला गेलो नाही कारण तेथे आमची स्थिती मजबूत नाही, परिस्थिती वेगळी होती. सोनियांची प्रकृती ठीक नव्हती व राहुल गांधीनी काही सभा घेतल्या. 

साताराच्या निकालाबाबत बोलताना पवार म्हणाले, सत्तेत सहभागी होण्यासाठी पक्षांतर झालं, विरोधी पक्षात राहून आपण सत्तेत सहभागी होऊ शकणार नाही हे दिसल्यानेच पक्षांतर केले गेले व लोकांना हेच पटले नाही त्या मुळे आमच्या बाजूने लोकांनी कौल दिला, असे पवारांनी उदयनराजे यांचा नामोल्लेख टाळून सांगितले. 

लोकसभेच्या वेळेस जे चित्र दिसले होते ते वंचित बहुजन आघाडीचे चित्र यंदा दिसले नाही, त्यांचा प्रभाव हळुहळू कमी होताना दिसत आहे, असेही पवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader Sharad pawar interview after vidhansabha election Maharashtra result