राज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचे गेले इतके बळी

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 4 March 2020

राज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचा ११ हजार ३०६ नागरिकांना प्रादुर्भाव झाला असल्याचे आढळले असून, ५ हजार ७२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिली.

मागील वर्षी सुमारे ११ हजार ३०६ नागरिकांना प्रादुर्भाव
मुंबई - राज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचा ११ हजार ३०६ नागरिकांना प्रादुर्भाव झाला असल्याचे आढळले असून, ५ हजार ७२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे यांच्यासह काही सदस्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात ९ टक्के रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवरील उपचारांच्या सुविधेबाबत आमदार डावखरे यांनी प्रश्न मांडला. 

राज्यात 'इतके' युनिट वीज मोफत मिळण्याची शक्यता; नवे वीज धोरण लवकरच 

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘‘राज्यात २०१९ मध्ये ५ हजार ७२७ रुग्णांचे मृत्यू झाले. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ११ जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांत महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रत्नागिरी येथील केमोथेरपी केंद्रात जानेवारीपर्यंत ४५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.’’ 

मुस्लीम आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा; शनिवारी अयोध्या दौरा निश्चित

होप ऑफ लाइफ संस्थेने राज्यात तीन हजार रुग्णांमागे एक तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे म्हटले होते, याबाबत आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. त्या वेळी मंत्री टोपे यांनी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे मान्य केले. मात्र, होप ऑफ लाईफने राज्यात असंसर्गजन्य आजाराबाबत अभ्यास केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

‘राज्यातील ११ जिल्ह्यांतील केमोथेरपी केंद्रातील फिजिशियन व स्टाफ नर्स यांना टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे एक महिन्याचे केमोथेरपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आत्तापर्यंत १६ जिल्हा रुग्णालयांतील फिजिशियन व स्टाफ नर्सना प्रशिक्षण दिले असून, २०२०-२१ पर्यंत उर्वरित जिल्ह्यातील फिजिशियन व स्टाफ नर्सला प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या उपलब्धतेनुसार केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे,’’ असे राजेश टोपे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of cancer deaths in year 2019 maharashtra states