कांद्याच्या भावात मोठी घसरण; 'हा' आहे आजचा भाव

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

  • मुंबईसह पुणे, कोल्हापूरमध्ये एका दिवसात दोन हजारांनी कमी भाव

नाशिक : लाल कांद्याची आवक वाढत चालली असल्याने भावातील घसरण सुरूच आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, चेन्नईमध्ये क्विंटलमागे एका दिवसात दोन हजार रुपयांनी भाव गडगडले आहेत. दुसरीकडे मात्र बंगळूरमध्ये कालच्याप्रमाणे (ता. 9) आज भाव राहिलेत. स्थानिक क्विंटलभर कांद्याला सात हजार, तर महाराष्ट्रातील कांद्याला 10 हजार रुपये मिळाले. राज्यात सर्वात कमी म्हणजेच, 47 रुपये किलो भावाने मनमाडमध्ये शेतकऱ्यांना कांदा विकावा लागला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कांद्याला आज मुंबईत 10 हजार, पुण्यात 11 हजार, कोल्हापूरमध्ये आठ हजार, तर चेन्नईमध्ये 10 हजार रुपये क्विंटल असा भाव मिळाला आहे. कोलकतामध्ये क्विंटलमागे पाचशे रुपयांनी भाव कमी होऊन तो नऊ हजार रुपये असा होता. पाटण्यात क्विंटलला साडेआठ हजार रुपये असे भाव स्थिर राहिले. जळगावमध्ये मात्र पावणेचारशे व लासलगावमध्ये तीनशे रुपये अधिकचा भाव मिळाला. जळगावमध्ये सहा हजार, तर लासलगावमध्ये 7 हजार 100 रुपये क्विंटल भावाने शेतकऱ्यांनी कांदे विकले आहेत. नागपूरमध्ये एक हजारांनी घसरण होत सहा हजार रुपये क्विंटल असा भाव होता.

खाते वाटपाचा तिढा सुटला? शिवसेनेला मिळणार 'ही' दोन महत्वाची खाती

इजिप्त आणि तुर्कस्तानमधून कांद्याची आवक करण्यात येत असून 55 ते 60 रुपये किलो भावाने हा कांदा देशात येईल. हा कांदा बाजारात येत असताना देशातील ताजा आणि चवीचा नवीन कांदा बाजारात उपलब्ध असेल. त्यामुळे आयात केलेल्या कांद्याला ग्राहकांची किती पसंती मिळते याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह आहे. याखेरीज देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी होत असल्याने विक्रीसाठी मिळणारा भाव आयात कांद्याला मिळण्याची साशंकता आता तयार झाली आहे.- नितीन जैन (कांद्याचे निर्यातदार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion prices regularly fall in Maharashtra